सरण येथून प्रचारानंतर परतताना राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडीदेवी यांचा ताफा थांबवल्यावर तपासणीवरून त्यांनी थयथयाट केला. हे जातीय शक्तींचे षड्यंत्र असल्याचा आरोप लालूंनी केला, तर आपल्या जिवाला धोका असल्याची तक्रार राबडीदेवी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. पैसे वाटण्यासाठी वाहन घेऊन जात असल्याच्या माहितीनंतरच ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पहाटे पोलिसांनी लालूंचे वाहन अडवून तपासणी करू देण्याची विनंती केली. मात्र महिला पोलीस नसल्याच्या कारणावरून लालूंनी त्याला नकार दिला.  वादावादी वाढल्यावर लालू प्रसाद यादव यांनी सरकारी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. त्यानंतर राबडीदेवी यांनी सोनेपूर पोलीस ठाण्यात जाऊन जिवाला धोका असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी ती तक्रार स्वीकारली, मात्र एफआयआर नोंदवला नाही. आम्हाला रोखण्याचा जातीय शक्तींचा कट आहे, असा कांगावा लालूंनी केला. लालू प्रसाद मतदारसंघात पैसे वाटत असल्याची माहिती मिळाल्यानेच आम्ही वाहनाची तपासणी करू देण्यास सांगितले, असे सरनचे पोलीस अधीक्षक सुधीरकुमार सिंह यांनी सांगितले. तसेच राबडीदेवी यांच्यासमवेत महिला पोलिस असल्याने महिला पोलीस नाही, हा लालूंचा आरोप चुकीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.