नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानमध्येच पाठवा म्हणजे विभागात अस्थैर्य येण्याचा प्रश्न येणार नाही, असा अजब युक्तिवाद राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. मोदी सत्तेत आल्यास उपखंडात अस्थिरता येईल, असे वक्तव्य पाकिस्तानचे मंत्री चौधरी निसार अली खान यांनी केले होते. त्यावर लालूंनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
मोदींना पाकिस्तानमध्ये पाठवणे हेच सर्व उपायांवरील औषध आहे, असे लालूंनी सांगत नवा वाद निर्माण केला आहे. त्यानंतर मोदींवरील एफआयआर आणि निवडणूक आयोग याचा विचार करू असे लालूप्रसाद म्हणाले. भाजपने तातडीने यावर प्रतिक्रिया देत लालूंनाच पाकिस्तानला का पाठवू नये, असा सवाल केला आहे. त्या देशात आपण लोकप्रिय आहोत असे लालू सांगतात, तेव्हा त्यांनाच पाकिस्तानला पाठवणे शहाणपणाचे ठरले असे शहानवाझ म्हणाले. पाकिस्तानच्या मंत्र्यांनी भारताबाबत बोलताना मर्यादा ओलांडू नये तसेच भारताच्या बाबींमध्ये ढवळाढवळ करू नये, असा इशारा दिला आहे.
मोदी म्हणजे कागदी वाघ..
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मोदींची संभावना करताना त्यांना कागदी वाघ म्हटले आहे. कागदी वाघ आणि रॉयल बंगाली वाघ यात फरक असल्याचा टोलाही ममतांनी मोदींना लगावला आहे.