भारतीय जनता पक्षाने(भाजप) ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना गांधीनगरची उमेदवारी देऊन पिंजऱयात कैद केल्याची टीका बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली आहे.
तसेच जगभरात व्यक्तीकेंद्रपणा नष्ट होण्याच्या मार्गावर असताना भाजपमध्ये एकाधिकारशाहीला महत्व दिले जात असल्याचा आरोप करत नितीश कुमारांनी मोदींवरही निशाणा साधला. ते बिहारमधील सभेत बोलत होते. भाजपमध्ये केवळ मोदींचेच नाव मोठे आहे. त्यांच्यापुढे आता ज्येष्ठ नेत्यांनाही मान दिला जात नाही. आपल्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ असलेल्या व्यक्तींना मोदी मान देत नाहीत. आता अडवाणी यांना गांधीनगरच्या पिंजऱयात कैद करुन ठेवण्याचा प्रताप त्यांनी केला असल्याचेही कुमार म्हणाले.
लालकृष्ण अडवाणी यांना गांधीनगरमधून उमेदवारी नको होती हे आता सर्वज्ञात झाले आहे. तरीही त्यांच्या इच्छेविरुद्ध गांधीनगरमधूनच उमेदवारी घोषित करण्यात आली परिणामी अडवाणींना गांधीनगरमधून लोकसभा लढविण्याची नामुष्की ओढावली. त्यामुळे भाजपमध्ये आता ज्येष्ठांच्या मताला मान राहिलेला नाही असेही नितीश कुमार म्हणाले.