..मग सोनियांचे राज्य कुठले-जेटली
सोनिया गांधी यांच्या विदेशी वंशाचा मुद्दा भाजप नेते अरुण जेटली यांनी उपस्थित केला आहे. अमृतसर मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले जेटली हे बाहेरचे उमेदवार असल्याची टीका काँग्रेसच्या अमरिंदर सिंग यांनी केली. त्यावर सोनिया गांधी कुठल्या राज्यातील आहेत, असा सवाल जेटलींनी केला आहे.
 कुठलाच मुद्दा नसल्याने अमरिंदर सिंग वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यांना आपण सभ्य भाषेतच उत्तर देऊ. आपले मूळ पंजाबमध्ये आहे, असे जेटली यांनी सांगितले. आपल्यावर आरोप करणारे अमरिंदर अजून मतदारसंघात फिरकलेदेखील नाहीत. निवडून आल्यावर आपले कार्यालय आणि घर अमृतसरमध्ये असेल, असे जेटली यांनी स्पष्ट केले. प्रतिष्ठेच्या अमृतसर मतदारसंघात जेटली यांच्या विरोधात काँग्रेसने ज्येष्ठ नेते अमरिंदरसिंग यांना उमेदवारी दिली आहे. मात्र अमरिंदरसिंह हे मतदारसंघात फिरकतही नसल्याचा आरोप जेटली यांनी केला

पवारांविरोधात  आयोगाकडे तक्रार
प्रतिनिधी,मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माथाडी कामगारांच्या मेळाव्यात दोनदा मतदान करण्याबाबत केलेले विधान हे उघड उघड आचारसंहितेचा भंग करणारे असल्यामुळे भाजप व आपने निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.
साताऱ्यात १७ तारखेला घडय़ाळावर शिक्का हाणा आणि मुंबईत २४ तारखेला पहिली शाई पुसून पुन्हा घडय़ाळावर शिक्का हाणण्याचे आवाहन  पवार यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. पवार यांचे विधान हे घातक असल्याचे सांगत ‘आप’ने पवार यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचे जाहीर केले तर भाजपचे ईशान्य मुंबईतील लोकसभेचे उमेदवार किरीट सोमय्या हे उद्या निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल करणार आहेत. पवार यांनी केलेले विधान हे निवडणूक प्रक्रियेसाठी घातक असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

शिवसेना खिळखिळी -अजित पवार  
प्रतिनिधी, ठाणे
शिवसेनाप्रमुखांच्या शब्दांना यापूर्वी शिवसेनेत शिवसैनिकांकडून मान होता. तो मान आताच्या शिवसेना
नेतृत्वाच्या शब्दाला राहिलेला नाही. लोकांना गद्दार म्हणून पक्ष चालत नाही. शिवसेनेत कोणाचा कोणावर वचक राहिला नाही. ज्येष्ठ नेत्यांना मान देण्याची पध्दत संपली आहे. संभ्रमावस्थेत असलेली शिवसेना आता खिळखिळी झाली आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी ठाण्यात केली.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाण्यात आघाडीची पहिली जाहिर सभा सेंट्रल मैदानात आयोजित केली होती.  शिवसेनेच्या कार्यपध्दतीवर सडकून टीका करताना अजित पवार म्हणाले, शिवसेनेत आता संभ्रमावस्था आल्याने शिवसैनिक हवालदिल झाला आहे. खासदार, आमदार शिवसेनेला सोडण्याच्या वाटेवर आहेत. शिवसेनेत आता विचार राहिला नाही. चुकीच्या पध्दतीने पक्ष चाललेला आहे अशी टीका त्यांनी केली.काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील व अन्य नेत्यांनी नरेंद्र मोदींच्या कार्यपध्दतीवर टीका करताना त्यांना सैतान, माकड अशा शेलक्या शब्दांनी हिणवले व टाळ्यांचा गजर मिळवला.

बाबर-जगताप भेटीने नवी समीकरणे
प्रतिनिधी, िपपरी
मावळ लोकसभेच्या िरगणात ‘संशयकल्लोळ’ असतानाच रविवारी त्यात नव्याने भर पडली. शिवसेनेतून बाहेर पडलेले खासदार गजानन बाबर यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. प्रत्यक्षात त्यांनी िरगणात न उतरण्याचा निर्णय घेतल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. त्यातच, चिंचवड येथे शेकाप व मनसेच्या पािठब्यावर िरगणात असलेले लक्ष्मण जगताप यांनी बाबरांची भेट घेऊन बराच वेळ ‘गुफ्तगू’ केल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत.तिकीट कापल्याने नाराज असलेले बाबर नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वाचे लक्ष आहे. बाबर समर्थकांनीही शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर हा गट मनसेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. तथापि, राज ठाकरे यांच्याशी भेट झाल्यानंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.