हेमा मालिनी यांना आयोगाची समज
मथुरा : निवडणूक आचारंसहितेचा भंग केल्याबद्दल निवडणूक आयोगाने भाजपच्या उमेदवार हेमामालिनी आणि राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार जयंत चौधरी यांना समज दिली आहे. जयंत चौधरी यांनी पूर्वपरवानगी न घेताच विविध वृत्तपत्रांतून जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल त्यांना आयोगाने समज दिली आहे. याच कारणास्तव हेमामालिनी यांनाही आयोगाने समज दिली आहे. या चुकांची पुनरावृत्ती होऊ देऊ नये, अशा सूचना आयोगाने या दोघांना दिल्या आहेत.

‘टीआरएस’ स्वबळावर लढणार
हैदराबाद : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाशी युती अथवा आघाडी न करता दोन्ही निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय तेलंगण राष्ट्र समितीने (टीआरएस) शुक्रवारी जाहीर केला. इतकेच नव्हे तर तेलंगणमधील विधानसभेच्या ११९ पैकी ६९ मतदारसंघातील उमेदवारांची पहिली यादीही जाहीरनाम्यासह घोषित करण्यात आली.

एनडीएला २३४-२४६ जागा ?
नवी दिल्ली :  आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला २३४-२४६ जागा मिळण्याची शक्यता असल्याचे सीएनएन-आयबीएन आणि सीएसडीएस यांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ११६ जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळी त्यांच्या जागांमध्ये वाढ होणार असून हा आकडा २०६-२१८ च्या घरात जाण्याची शक्यता आहे. तर कॉंग्रेसच्या जागांमध्ये मोठी घसरण होणार असून यावेळी ९४-१०६ जागा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला २०६ जागा मिळाल्या होत्या. मोदींना ४४ टक्के लोकांनी पसंती राहुल गांधी यांना २४ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

जनमत चाचण्यांना बंदी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पाश्र्वभूमीवर अनुक्रमे ७ एप्रिल आणि १२ मे रोजी जनमत चाचणी करण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे.  कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी मतदानानंतर कोणत्याही प्रकारच्या जनमत चाचण्या घेऊ अथवा माहिती प्रकाशित करू नये असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
लोकसभेसह आंध्र प्रदेश, ओदिशा, सिक्किम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहे. त्यामुळे लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकांसाठीही जनमत चाचण्या घेऊ नये,असे आयोगाने बजावले आहे.