स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी सहाय्य करू-मोदी
गुंटूर (आंध्र प्रदेश):काँग्रेसवर विश्वासघातकीपणाचा आरोप करीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सीमांध्रातील तरुणांच्या मागे ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिल़े  येथील तरुणांना आश्वस्त करताना त्यांची स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी साहाय्य करण्याचेही वचन त्यांनी दिल़े ‘माता-पुत्रा’च्या शासनाने तुमचा विश्वासघात केला आहे आणि तुमची स्वप्नेही कुस्करून टाकली आहेत़  त्यांनी तुम्हाला अनाथ करून सोडले आह़े  परंतु या वेळी तुम्हाला असे सरकार निवडायचे आहे, जे तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहील़  
जनता दलाचा वाराणसीत केजरीवाल यांना पाठिंबा
पाटणा: वाराणसी या लोकसभा मतदारसंघात संयुक्त जनता दल(जदयु)ने आपले वजन केजरीवाल यांच्या पारडय़ात टाकले आह़े  मोदींचा पराभव करण्यासाठी या जागेवर उमेदवार उभा न करता केजरीवाल यांनाच पाठिंबा देण्याचा निर्णय जदयुने घेतला आह़े
जदयु हा काँग्रेस आणि भाजप अशा दोघांचाही विरोधक आह़े  त्यामुळेच वाराणसीत केजरीवाल यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े  या संदर्भातील निर्णय पक्षाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे जदयुचे प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद यांनी गुरुवारी जाहीर केल़े  
मोदींविरोधात दोन शंकराचार्य
वाराणसी:दोन शंकराचार्य येत्या लोकसभा निवडणुकीत वाराणसी मतदारसंघात नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रचार करणार आहेत़  पूरी पीठाचे शंकराचार्य स्वामी अधोक्षजानंद देवतीर्थ यांनी मोदींना २००२ सालच्या गुजरात दंगलींसाठी जबाबदार धरले आह़े, तर द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे ‘हर हर मोदी’ घोषणेपासून मोदींवर डोळे वटारून आहेत़  त्यामुळे या दोन्ही शंकराचार्यानी मोदींविरोधात प्रचार करण्याचा निर्णय घेतला आह़े