आलेमाव यांचा काँग्रेसला रामराम
पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी शनिवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. आपली कन्या वलंका हिला काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याच्या निषेधार्थ आलेमाव यांनी सदर निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या २० सदस्यीय मध्यवर्ती निवडणूक समितीने उमेदवारीबाबत निर्णय घेतला असल्याने आपल्याला तो स्वीकारणे गरजेचे आहे, असे फर्नाडिस यांनी या वेळी आलेमाव यांना सांगितले. दरम्यान, निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करण्याची शक्यता आलेमाव यांनी फेटाळली नाही.

कुमार विश्वास यांच्याविरोधात गुन्हा
अमेठी : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांच्या अमेठी या मतदारसंघातच आव्हान देणारे ‘आप’चे उमेदवार कुमार विश्वास यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े  येथील शुकुल बाजार पोलीस ठाण्यात विश्वास आणि त्यांच्या ४० समर्थकांच्या विरोधात शनिवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला़ येथील बाबा लतिफ शहा यांच्या जगदीशपूर दग्र्यावर चादर चढविण्यास जाताना विश्वास यांच्यासोबत सहा गाडय़ांचा ताफा होता़  तसेच अनेक कार्यकर्तेही त्यांच्यासोबत होत़े  यासाठी विश्वास यांनी कोणतीही पूर्वपरवानगी घेतलेली नव्हती़  त्यामुळे त्यांच्यावर आणि कार्यकर्त्यांवर बेकायदा जमाव केल्याचा आणि आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्षलग्रस्त मतदारसंघात ४८ हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी
पाटणा : बिहारमधील नक्षलग्रस्त सहा मतदारसंघांत १० एप्रिल रोजी मतदान होणार असून त्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ४८ हजारांहून अधिक सुरक्षा अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात येणार असून ते नक्षलवाद्यांना सडेतोड जबाब देणार आहेत. केंद्रीय निमलष्करी दलाच्या १६५ कंपन्या आणि ३० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी नक्षलवाद्यांना जशास तसे उत्तर देतील. सासाराम, काराकत, औरंगाबाद, गया, नवाडा, जामुई या मतदारसंघांसाठी हा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसापूर्वी एक आठवडा अगोदरच सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. वनक्षेत्रांवर लष्कराची हेलिकॉप्टर नजर ठेवणार आहे. लोकसभेच्या अध्यक्षा मीराकुमार, काँग्रेसचे नेते निखिलकुमार, चिराग पासवान, आदी प्रमुख नेते येथून रिंगणात आहेत.

‘एमडीएमके’च्या जाहीरनाम्यात ‘युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया’
चेन्नई :  तामिळनाडूत भाजपशी आघाडी असलेला एमडीएमके पक्ष पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरला आहे. राज्यांना अधिक अधिकार दिले पाहिजेत, या मागणीसाठी वायको यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने ‘युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया’ संकल्पना मांडली आहे. देशाची अंखडता आणि एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी संघराज्याचे संरक्षण केलेच पाहिजे. मात्र घटनेत दुरुस्ती करून ‘युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया’ स्थापन करण्याची गरज आहे, असे आम्हाला वाटते, असेही वायको यांनी म्हटले आहे. वायको यांनी आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात स्वतंत्र इलम, श्रीलंकेच्या नेव्हीकडून भारतीय मच्छीमारांवर होणारे हल्ले, तामिळला अधिकृत भाषेचा दर्जा, शैक्षणिक संस्थांमध्ये २७ टक्केआरक्षण आदींचा समावेश केला आहे.