जाहिरातींसाठी सर्वोच्च न्यायालयातर्फे समितीची नियुक्ती
नवी दिल्ली : वृत्तपत्रे आणि दूरदर्शनला जाहिराती देताना सरकार अथवा अधिकाऱ्यांकडून राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सार्वजनिक निधीचा गैरवापर होऊ नये, या बाबत मार्गदर्शक तत्त्वे आखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक समिती स्थापन केली आहे. सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांनी या बाबत म्हटले आहे की, जनतेच्या पैशांमधून अशा प्रकारच्या जाहिराती देण्यासंदर्भात नियमन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांची गरज आहे. राष्ट्रीय न्यायिक अकादमीचे माजी संचालक एन. आर. माधव मेनन, लोकसभेचे माजी सचिव टी. के. विश्वनाथन, ज्येष्ठ विधिज्ञ रणजितकुमार आणि माहिती व प्रसारण विभागाचे सचिव अशी चार सदस्यीय समिती सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केली आहे. अहवाल सादर करण्यासाठी समितीला तीन आठवडय़ांची मुदत देण्यात आली आहे.
मिस्त्री यांचे धरणे आंदोलन
बडोदा : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची बदनामी करणारी पुस्तिका प्रकाशित केल्याबद्दल बडोदा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मधुसूदन मिस्त्री यांच्याविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे. मात्र आपल्याविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आल्याच्या निषेधार्थ मिस्त्री यांनी धरणे आंदोलन पुकारले आहे. भ्रष्टाचार आणि महिला पाळत प्रकरणाचा उल्लेख सदर पुस्तिकेत करण्यात आल्याने मोदी यांची बदनामी झाली आहे, असे स्पष्ट करून मिस्त्री यांच्याविरुद्ध मंजलपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. आपल्याविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आल्याचे कळताच मिस्त्री तातडीने दिल्लीहून येथे आले आहेत. या पुस्तिकेमुळे कोणत्याही कायद्याचे उल्लंघन झालेले नाही त्याचप्रमाणे त्यामध्ये मोदींचा उल्लेख नाही, असा त्यांचा दावा आहे.
झेवियर्सच्या प्राचार्याकडून खुलासा मागविला
 मुंबई:‘झेवियर्स’च्या प्राचार्यानी नरेंद्र मोदींच्या ‘गुजरात मॉडेल’ वर टीका केल्याने भाजपने निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून त्याबाबत आयोगाने प्राचार्याकडून स्पष्टीकरण मागविले आहे.
प्राचार्य फादर फ्रेझर मस्करेन्हस यांनी विद्यार्थ्यांना पत्र लिहून विचारपूर्वक मतदानाचे आवाहन केले होते. त्याला भाजपने आक्षेप घेतला आहे.
तेलगु देसम-भाजप आघाडीला संपूर्ण पाठिंबा – पवन कल्याण
हैदराबाद:गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी तेलगु चित्रपट अभिनेता आणि केंद्रीय मंत्री चिरंजीवी यांचा भाऊ पवन कल्याण याने तेलगु देसम-भाजप आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये आपला तेलगु देसम-भाजपला पूर्ण पाठिंबा राहील, असे पवन कल्याण यांनी म्हटले आहे.तेलगु देसम पक्षाचे नेते एन. चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी दुपारी पवन कल्याण यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली आणि राजकीय आणि प्रचाराशी संबंधित विषयांवर चर्चा केली. मोदी पंतप्रधान व्हावेत हीच आमची इच्छा आहे, रिमोट कंट्रोल नसलेला पंतप्रधान आम्हाला हवा आहे, असे चंद्राबाबू आणि पवन कल्याण यांनी सांगितले.