राहुल गांधी देशाचे नेतृत्व  कसे करणार- नरेंद्र मोदी
सरगुजा (छत्तीसगढ) : अमेठी मतदारसंघ ज्यांना सांभाळता येत नाही ते राहुल गांधी देशाचे नेतृत्व काय करणार, असा सवाल नरेंद्र  मोदी यांनी करत येथील सभेत टीकास्त्र सोडले. मोदींनी गांधी घराण्यावर टीका सुरूच ठेवत, सोनियांचे जावई रॉवर्ट वधेरा यांची संपत्ती इतकी कशी वाढली, असा सवाल करत माँ-बेटे का सरकार अशा शब्दात संभावना केली. सोनियांनी अमेठीतील नागरिकांना तुम्ही राहुलची काळजी करा, तो देशाची चिंता करेल असे सांगितले. त्याचा उल्लेख करत, जर अमेठी सांभाळता येत नसेल तर देश कसा सांभाळणार, असा सवाल मोदींनी केला. राहुल गांधी देशाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप मोदींनी केला.
मतदानापर्यंत ‘टीव्हीच’बंद ठेवा; काँगेस नेत्याचा सल्ला
कराऊली (राजस्थान) : भाजपने निवडणूक प्रचारांच्या जाहिरातींचा जोरदार मारा चालवल्याने काँग्रेसचे सरचिटणीस सी. पी. जोशी यांनी मतदारांना २४ एप्रिलपर्यंत चित्रवाणी संच बंद ठेवा, असा सल्लाच दिला आहे. राजस्थानमधील उरलेल्या पाच मतदारसंघांत २४ एप्रिलला मतदान होणार आहे. कोणतीही भाजपची लाट नाही. तुम्ही आणखी तीन दिवस चित्रवाणी संच बंद ठेवा आणि काँग्रेसला मतदान करा असा सल्ला जोशी यांनी येथील प्रचारसभेत दिला. विशेष म्हणजे या सभेत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचेही भाषण झाले.
विनोद खन्ना यांची काँग्रेस उमेदवारावर टीका
गुरुदासपूर : गुरुदासपूर येथे सध्या काँग्रेसविरोध लाट असून, सध्याचे काँग्रेस खासदार जनतेच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरले आहेत, अशी टीका या मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांनी केली. गेल्या लोकसभा निवडणुकीत येथील जनतेने काँग्रेसच्या प्रतापसिंग बाजवा यांच्या गळय़ात विजयाची माळ टाकली, मात्र बाजवा हे या मतदारसंघात फिरकलेही नाही. त्यामुळे या मतदारसंघाचा विकास रखडला, असे खन्ना यांनी सांगितले.
जातीय शक्ती, घराणेशाहीला पराभूत करा – मायावती
बाराबंकी/सीतापूर : बसपाने मुस्लिमांना सर्वाधिक उमेदवारी दिली आहे. जातीय शक्ती आणि घराणेशाहीला पराभूत करण्यासाठी बसपाला मतदान करा, असे आवाहन मायावतींनी मुस्लिमांना केले.
येथील जाहीर सभांमध्ये त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी मुस्लिमांनी एकजुटीने मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. नरेंद्र मोदी जर पंतप्रधान झाले तर देशात जातीय तणाव वाढेल, असा इशाराही मायावतींनी दिला. समाजवादी पक्ष किंवा काँग्रेसला मतदान करणे म्हणजे मत वाया घालवणे आहे, असा दावाही त्यांनी केला.