मोदीसमर्थक तमिळ लेखकाला धमक्या
चेन्नई : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शविणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध तमिळ लेखक आर. एन. जोई डी’क्रूज यांना धमक्या देण्यात आल्याची तक्रार त्यांनी केली आहे. मोदींना पाठिंबा दर्शविल्यामुळे आपल्यावर टीका करणारे मेलही प्राप्त झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. मच्छीमारांच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या डी’क्रूज यांनी मोदींना अनुकूल असणारे मतप्रदर्शन काही दिवसांपूर्वी फेसबुकवर व्यक्त केले होते. त्यानंतर आपल्याला धमक्या आल्या असून आपल्या साहित्याचीही गळचेपी करण्याची धमकी देण्यात आली आहे. मात्र आपण घाबरणार नसून मोदींना मनापासून पाठिंबा दर्शविला असल्याचेही डी’क्रूज यांनी स्पष्ट केले.
शासकीय इमारतींवर जाहिराती नकोत
चंडीगढ : राजकीय स्वरूपाच्या कोणत्याही जाहिराती शासकीय इमारतींवर तसेच सार्वजनिक मालकीच्या मात्र भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या इमारतींवर लावण्यास मनाई करण्याचा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. सार्वजनिक मालकीच्या जागांचा राजकीय प्रचारासाठी गैरवापर होत असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्या पाश्र्वभूमीवर आयोगाने आदेश दिले आहेत.
अर्थमंत्र्यांची पुत्रासाठी लगबग
शिवगंगा :  देशाचे अर्थमंत्री पी़  चिदम्बरम हे ज्या मतदारसंघातून  तब्बल सात वेळा लोकसभेत निवडून गेले. मात्र तेथूनच देशात काँग्रेसविरोधी वातावरण असताना पुत्र कार्ती खासदार झालेले पाहाता यावा यासाठी त्यांची एकच लगबग सुरू आह़े या वेळी असलेल्या काँग्रेसविरोधी वातावरणाचा लाभ उठवून येथे चिदम्बरम पुत्राला चीतपट करण्याचे मनसुबे विरोधकांकडून आखले जात आहेत़  बेरोजगारी आणि विकासाचा अभाव हे दोन प्रमुख मुद्दे विरोधकांकडून चिदम्बरम राजवटीविरोधात वापरण्यात येत आहेत़, तर बँकिंग क्षेत्राची येथे वाढ करून गरिबांना आर्थिक क्षेत्रात समाविष्ट करून घेतल्याचा दावा करून चिदम्बरम हे वार परतवून लावीत आहेत़
मोदी ब्रँडला वाढती मागणी
नवी दिल्ली : अवघ्या दोन महिन्यांत नरेंद्र मोदी यांचा जीवनपट मांडणारी १० पुस्तके एकामागोमाग एक बाजारपेठेत आलीआहेत. निवडणुकीच्या निमित्ताने ‘ब्रँड मोदी’ जोशात आहे.त्यांच्या जीवनावरील पुस्तकांना लोकांकडून प्रचंड मागणी आहे. म्हणून ही पुस्तके बाजारात आणल्याचे प्रकाशक सांगत आहेत. थोडय़ाच दिवसांत त्यांच्या जीवनावरील एक अ‍ॅनिमेशनपटही येणार आहे.