08 August 2020

News Flash

प्रचारातील उणिवा ‘विधानसभेत’दूर करण्याचा निर्धार

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपच्या तुलनेत आपण फारच मागे पडलो. आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ता कायम राखण्यासाठी प्रचारात आक्रमकपणा ठेवावा लागेल आणि आधीच्या उणिवा दूर कराव्या लागतील

| May 4, 2014 03:39 am

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपच्या तुलनेत आपण फारच मागे पडलो. आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ता कायम राखण्यासाठी प्रचारात आक्रमकपणा ठेवावा लागेल आणि आधीच्या उणिवा दूर कराव्या लागतील, असे स्पष्ट मत राज्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रदेश पदाधिकारी, उमेदवार आणि जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडली. भाजपची प्रचार यंत्रणा, राष्ट्रवादीच्या कुरघोडय़ा यावर चर्चा करण्यात आली. भाजप किंवा विरोधकांनी सुनियोजितपणे प्रचार यंत्रणा राबविली. युतीच्या उमेदवारांना कोठे काही कमी पडले नाही. काँग्रेसमध्ये मात्र प्रचारात समन्वय नव्हता, असा आरोप काही नेत्यांनी केला. काही उमेदवारांनी स्वत:ची पर्यायी प्रचार यंत्रणा राबविली आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही, असाही आरोप झाला. राष्ट्रवादीनेही त्यांच्या उमेदवारांची योग्य खबरदारी घेतली. काँग्रेसच्या प्रचाराकरिता काही ठिकाणी हात पसरावे लागल्याची माहिती देण्यात आली. विधानसभा निवडणुकीत सत्ता कायम राखण्यासाठी आतापासूनच आक्रमक झाले पाहिजे. तसेच जशास तसे उत्तर देण्याकरिता प्रचाराच्या साऱ्या यंत्रणा राबवाव्या, अशी मागणी करण्यात आली.
राज्यातील सत्ता कायम राखण्याचे मोठे आव्हान असल्याचा एकूणच पदाधिकाऱ्यांचा सूर होता. पक्षाची प्रतिमा सुधारण्याकरिता लोकोपयोगी निर्णय घेण्याची मागणी झाली. त्यावर काही धोरणात्मक निर्णय लवकरच घेतले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
‘निवडणूक कठीण, पण निवडून येणारच’
पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी उपस्थित काँग्रेस उमेदवारांशी स्वतंत्र चर्चा केली. निवडणुकीचा निकाल आणि पक्षाच्या नेत्यांनी काम केले का, याची विचारणा उमेदवारांकडे करण्यात आली. पक्षाचे २६ उमेदवार रिंगणात असले तरी आजच्या बैठकीला १० ते १२ उमेदवारच उपस्थित होते. उपस्थित काही उमेदवारांनी निवडणुकीत मोठे आव्हान होते, पण आपणच निवडून येऊ, असे सांगितले. उमेदवारांबरोबरच पदाधिकाऱ्यांची उपस्थिती कमी होती.
राष्ट्रवादीबरोबरच लढणार
राष्ट्रवादीच्या कुरघोडय़ांबाबत नंदुरबार, पुणे, सांगली, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. राष्ट्रवादीच्या मागे फरफट होत असल्याचे काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. आघाडीबद्दल वेगवेगळी मते असू शकतात, पण आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर आघाडी कायम राहणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. या तयारीसाठी सर्व २८८ मतदारसंघांमध्ये निरीक्षक पाठविण्यात आले याचा अर्थ काँग्रेस वेगळे लढण्याची तयारी करीत नाही. राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लोकसभेच्या वेळी सर्व ४८ मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला होता तसाच आढावा सर्व मतदारसंघांचा घेतला जाईल, असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले.  विधानसभा निवडणूक काँग्रेसबरोबरच लढणार, असे अलीकडेच राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांनी जाहीर केले. आता मुख्यमंत्र्यांनीही हीच भूमिका घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2014 3:39 am

Web Title: lok sabha lacks will be filled in assembly election congress
Next Stories
1 ममतांकडून घुसखोरांचे लांगूलचालन – मोदी
2 राज्यमंत्री फौजिया खान यांना राष्ट्रवादीची नोटीस
3 ‘सामना’च्या भूमिकेपासून शिवसेनेचे घुमजाव!
Just Now!
X