मेरी झांसी नही दूंगी -उमा भारती
मीरत : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात रायबरेली येथून निवडणूक लढवावी, अशी इच्छा पक्षाकडून व्यक्त करण्यात आली असली तरी झांसी मतदारसंघ सोडण्यास भारती तयार नाहीत. ‘मै मेरी झांसी नही दूंगी’ असे भारती यांनी शुक्रवारी सांगितले. झांसी येथून उमेदवारी अर्ज भरलेला असताना आता तो मागे घेण्यात येणार नाही, असे भारती म्हणाल्या. भारती यांची इच्छा नसेल, तर त्यांनी मतदारसंघ बदलू नये. रायबरेली आणि अमेठी येथील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, असे भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी सांगितले. बाबा रामदेव यांनीही काही दिवसांपूर्वी भारती यांनी रायबरेली किंवा अमेठी येथून लढावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. ‘मी पक्षाची इच्छा आणि बाबा रामदेव यांचा आदर करते. मात्र मतदारसंघ बदलण्याचा कोणताही विचार मी केलेली नाही,’ असे भारती यांनी सांगितले.

केजरीवाल यांना मारहाणीचा प्रयत्न
चरखी दादरी :आम आदमी पक्षाच्या शुक्रवारी हरयाणात निघालेल्या प्रचारयात्रेदरम्यान एका नागरिकाने पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवत त्यांच्या मानेवर फटका मारण्याचा प्रयत्न केला. आप समर्थकांनी मात्र तात्काळ त्या नागरिकाला बेदम मारहाण केली. जितेंद्र लेघान असे हल्लेखोराचे नाव असून तो लेघान गावचा रहिवासी आहे. केजरीवाल यांनी त्याला आपल्या समर्थकांनी केलेल्या मारहाणीचा निषेध केला आहे. केजरीवाल हे सध्या हरयाणा आणि पंजाबच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.

नगमाने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या श्रीमुखात भडकावली
मीरत : उत्तर प्रदेशातील मीरत लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर उभ्या असलेल्या अभिनेत्री नगमाने गुरुवारी रात्री स्वपक्षाच्याच एका कार्यकर्त्यांच्या श्रीमुखात भडकावली. जलीकोटी भागातील प्रचारसभा आटोपून गाडीमध्ये बसायला जात असताना नगमाला कार्यकर्त्यांनी घेराव घातला. त्यामुळे चिडलेल्या नगमाने एका कार्यकर्त्यांवर हात उगारला. बॉलीवूड तारका असल्याने नगमाला भेटण्यासाठी येथे काँग्रेसचे नेते, कार्यकर्त्यांची नेहमीच गर्दी होत असते. सोमवारी मीरतमध्ये झालेल्या प्रचारसभेत तर गजराज शर्मा या काँग्रेस आमदाराने नगमाचे चुंबन घेतले होते. त्या वेळीही चिडलेल्या नगमाने शर्मा यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे सांगितले होते.