भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना सोळाव्या लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्रद्धांजलीनंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. उद्या, गुरुवारी नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली जाणार आहे.
नरेंद्र मोदी यांचे सभागृहात आगमन होताच भाजप सदस्यांनी बाके वाजवून आनंद व्यक्त केला.  काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व मोदी यांनी परस्परांना अभिवादन केले. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी मोदींशी ‘हातमिळवणी’ करून शुभेच्छा दिल्या. सर्व सदस्यांचे लक्ष मोदींकडे केंद्रीत झालेले असताना त्यांच्यापाठोपाठ लालकृष्ण अडवाणी सभागृहात दाखल झाले. पंतप्रधान मोदी पहिल्या रांगेत बसले. त्यांच्या शेजारी लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, रामविलास पासवान, वैंकय्या नायडू, सुषमा स्वराज, राजनाथ सिंह व नितीन गडकरी बसले होते.   विरोधी पक्षासाठी असलेल्या पहिल्या रांगेत सोनिया गांधी, मल्लिकार्जून खरगे, वीरप्पा मोईली व मुनियप्पा बसले होते.

आज सदस्यांचा शपथविधी
लोकसभा सदस्यांना गुरुवारी शपथ दिली जाणार आहे. सर्वप्रथम पंतप्रधान व मंत्रिपरिषदेचे सदस्य शपथ घेतील. त्यानंतर राज्यनिहाय शपथ दिली जाईल.  ९ जून रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी दोन्ही सभागृहांना संबोधित करतील.