लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीसाठी भिवंडीतून मंगलप्रभात लोढा, उत्तरमध्य मतदारसंघात पूनम महाजन तर पुण्यातून प्रकाश जावडेकर यांच्या नावाचा विचार सुरू आहे. मात्र इच्छुकांची संख्या अधिक आणि मतदारसंघातील राजकीय गणिते तपासून पक्षाची सुकाणू समिती पुढील आठवडय़ात उमेदवार निश्चित करणार आहे.
उमेदवार ठरविण्यासाठी भाजप प्रदेश सुकाणू समितीची बैठक विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चालली. त्यात कोणाचीही नावे ठरली नसली तरी अनेकांबाबत चर्चा झाली. दक्षिण मुंबई मतदारसंघ शिवसेनेकडून भाजपला अदलाबदलीत मिळावा, यासाठी बरेच प्रयत्न झाले. या मतदारसंघात शिवसेनेने संधी न दिल्यामुळे लोढा आता भाजपकडील भिवंडीच्या जागेवर निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.
पूनम महाजन यांना ईशान्य मुंबईत उमेदवारी हवी होती. पण तेथे किरीट सोमय्या यांना ती देण्यात आली. उत्तर मध्य मतदारसंघात प्रिया दत्त यांच्या विरोधात पूनम महाजन यांच्या नावाचा विचार सुरू आहे. प्रकाश जावडेकर यांच्या राज्यसभेच्या जागेवर रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांना उमेदवारी देण्यात आली. पुण्यातून श्रीकांत शिरोळे, आमदार गिरीश बापट यांच्याबरोबरच आता जावडेकर यांच्या नावाचाही विचार केला जात आहे.  प्रदेश समितीकडून नावे निश्चित झाल्यावर केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठविली जातील.