मोदी पंतप्रधान होतील का, या आणि अशा बहुसरधोपट कुतूहलाच्या काथ्याकुटीत न रमता येणाऱ्या सरकारची आर्थिक धोरणे कशी असावीत, मनसे आणि शिवसेना यांच्यातील भाऊबंदकीमुळे महाराष्ट्राचे नुकसान होते आहे का, या आणि अशा असंख्य सुजाण आणि व्यापक मुद्दय़ांवरील प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न लोकसत्ता संकेतस्थळाच्या वाचकांनी गुरुवारी केला.
लाइव्ह चॅटमधील प्रश्नोत्तरे वाचण्यासाठी इथे क्लिक करा
मराठी वृत्तपत्रविश्वात पहिल्यांदाच थेट संपादकांशी करण्यात आलेल्या ‘लाइव्ह चॅट’ या अनोख्या उपक्रमाला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. फक्त तासाभराची वेळ नियोजित असतानाही वाचकांच्या अलोट प्रतिसादामुळे जवळपास तीन तास लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते.
 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या गदारोळात नेमकी सद्य राजकीय परिस्थिती कशी आहे आणि त्यातून काय बोध घ्यावा याचा ऊहापोह लाइव्ह चॅटच्या माध्यमातून झाला. अपेक्षेप्रमाणे लोकसत्ताच्या वाचकांनी आपल्या मनातील प्रश्न अगदी नेमकेपणाने मांडले. विशेष म्हणजे  केवळ निवडणुकीशी संबंधित प्रश्न न विचारता वाचकांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारण, आर्थिक ध्येय-धोरणे, जुन्या-नव्या राजकीय पक्षांचे भवितव्य, व्यक्ती आणि पक्षीय राजकारणाचा प्रभाव या पैलूंशी संबंधित प्रश्न विचारून या उपक्रमाकडे अतिशय गांभीर्याने पाहिल्याचे दिसत होते.
राजकारणापेक्षा प्रशासकीय सुधारणा करणे अधिक महत्त्वाचे आहे, ‘नोटा’चा अधिकार कितपत फलदायी ठरेल, उमेदवारांसोबतच मतदारांची साक्षरताही ध्यानात घ्यायला हवी, चीनसारखी अधिक रोजगारनिर्मिती भारतात करण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील तसेच निधर्मीपणा हा मुद्दा संपला आहे का? असे गंभीर आणि वैचारिक पातळीवर चर्चेला मोठय़ा प्रमाणात वाव असणारे शेकडो प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. यावरूनच इंटरनेटचा वाचकही अधिक गंभीरपणे आजूबाजूच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीकडे पाहतो हे प्रकर्षांने जाणवले.
अनेक वाचकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करीत तो नियमितपणे राबविण्याची मागणीही केली आहे. वाचकांच्या उदंड प्रतिसादाचा विचार करता पुढील काळातही विविध विषयांवर लाइव्ह चॅट आयोजित करण्यात येईल.