07 July 2020

News Flash

कार्यकर्ता, उमेदवार, नेता : सबकुछ एक!

पहाटे साडेपाच वाजता मेधाताईंचा दिवस सुरू झालेला असतो. कार्यकर्त्यांंशी चर्चा, विचारविनिमय सुरू असतो. गेल्या ३८ वर्षांमध्ये विविध आंदोलनांमधून मेधाताईंनी भरपूर लोकसंचय जमा केला आहे.

| April 17, 2014 02:01 am

पहाटे साडेपाच वाजता मेधाताईंचा दिवस सुरू झालेला असतो. कार्यकर्त्यांंशी चर्चा, विचारविनिमय सुरू असतो. गेल्या ३८ वर्षांमध्ये विविध आंदोलनांमधून मेधाताईंनी भरपूर लोकसंचय जमा केला आहे. त्यामुळेच प्रचारासाठी केरळ, उत्तरांचल, पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात येथून कार्यकर्ते आलेले असतात.  
सकाळी नऊ वाजता चेंबूर येथील घरी मेधाताई हॉलमध्ये दिवाणावर काहीतरी वाचत असतात. पाहुण्यांना बसण्याची विनंती त्या स्वत  करतात आणि कार्यकर्त्यांची ओळखही करून देतात. पहाटे साडेपाच वाजता त्यांचा दिवस सुरू झालेला असतो. कार्यकर्त्यांंशी चर्चा, विचारविनिमय सुरू असतो. केरळचे आयुर्वेदिक डॉक्टर जेकब वडकेंचेरी फक्त मेधाताईंसाठी एक दिवस प्रचारासाठी मुंबईला आलेले असतात. मेधाताईंच्या घरातच हॉलमध्येच त्यांचे निवडणूक कार्यालय आहे. एका कोपऱ्यात प्रचाराचं सामान पडलेलं असतं. कपाटावरील काचांवर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या विधानसभा क्षेत्रांचे नकाशे लावलेले आहेत. प्रचाराला निघण्यासाठी सामान गाडीत भरलं जात असतं. या धावपळीत असं लक्षात येतं की, निवडणुक प्रचारात फिरवला जाणारा मदतनिधीसाठीचा डबा जड झाला आहे. सर्वासमोरच कार्यकर्ते हा डबा उघडतात. त्यामध्ये लोकांनी केलेल्या मदतनिधीची मोजणी केली जाते. एक रूपयापासून ते पाचशे रूपयांपर्यंत लोकांनी केलेली मदत पाहून जमलेल्यांनाच मेधाताई प्रश्न करतात, खरंच निवडणुकीसाठी ७० लाखांची आवश्यक आहे का? तिथे उपस्थित सीए मग ती रक्कम नीट मोजतो आणि नोंदी करून ठेवतो.
एव्हाना साडेदहा वाजलेले असतात.

दाराबाहेर कार्यकर्त्यांच्या चपलांच्या ढिगातून मेधाताई आपली चप्पल शोधतात आणि पायात सरकवतात. मेधाताईंकडे स्वतची गाडी नाही. निवडणुकीसाठी जमा झालेल्या निधींमधूनच प्रचारासाठी सुझुकीची साधी गाडी भाडय़ाने घेण्यात आलेली आहे. गाडी निघते तेव्हा मागेपुढे ना कार्यकर्त्यांच्या गाडय़ांचा ताफा असतो, ना पोलिस संरक्षण. वाटेत काही फोन कॉल्स घेत मतदारसंघातील प्रचाराबाबत माहिती देत-घेत असतात. सिग्नलला गाडी थांबल्यावर बाजूला थांबलेल्या रिक्षाचा चालक आणि रिक्षातील प्रवाशांनी मेधाताईंना हात केल्यावर त्यासुध्दा हसतमुखाने प्रतिसाद देतात. कन्नमवार नगरच्या नाक्यावर एक तरूण मेधाताईंच्या गाडीला बाइकवरून रस्ता दाखविण्यासाठी उभा असतो. ‘हा पारध्यांचा नेता’, म्हणून मेधाताई त्याची ओळख करून देतात. कन्नमवार नगर १ मध्ये मेधाताईंची गाडी पोहोचते तेव्हा ‘आप’च्या टोप्या घातलेले आणि हातात झाडू घेतलेले २०-२५ कार्यकर्ते स्वागताला उभे असतात. यायला उशीर झाल्याबद्दल त्यासुध्दा माफी मागतात. ‘आवाज दो, हम एक है, लढेंगे जितेंगे, चुनाव नही चुनौती है’.. स्वत मेधाताई घोषणा द्यायला सुरूवात करतात तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारतो.  जनलोकपाल, आदर्श घोटाळा, लवासा ते मुंबईतील झोपडय़ांचा प्रश्न असे दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे मुद्दे त्यांच्या बोलण्यात येतात.  छोटेखानी भाषण दिल्यावर कोणीतरी पाणी पुढं करतं. मेधाताई दोन घोट घेतात आणि ती बाटली कार्यकर्त्यांसाठी पुढे करतात. जवळपास प्रत्येक बिल्डिंगमध्ये महिला ओवाळणी घेऊन येत असतात. काहीजण हार आणत असतात. हाराला त्या नकार देतात आणि आपल्या सोबतच्या महिला कार्यकर्त्यांच्या गळ्यात तो हार स्वत घालतात. ‘मतांची भीक मागण्यासाठी नाही, पटलं तर मत द्या’, असं सांगत असतात. एक वयस्कर नागरिक खिडकीतूनच मेधाताईंना जवळ बोलवतात आणि आम आदमी पक्षाकडून आमच्या खूप अपेक्षा होत्या परंतू केजरीवालांनी काढलेला पळ आम्हाला पटला नाही, असं सांगतो. त्यांचं म्हणणं ऐकून घेत त्या केजरीवालांची बाजू मांडतात.  गेल्या लोकसभा निवडणुकीत या विभागातील पाच लाख महिलांनी मतदानाचा हक्क बजावला नव्हता, त्याची आठवण करून देत, महिलांना विशेष विनंती करण्याचंही त्या विसरत नाहीत. असा पायी प्रचार सलग तीन तास दुपारी दोन वाजेपर्यंत चालतो. त्यानंतर कन्नमवार नगरमधीलच एका मंदिराच्या चौथऱ्यावर दुपारच्या भोजनासाठी विश्रांती घेतली जाते. जेवण संपल्यावर कुणीतरी शहाळं आणून देतं, प्रचारादरम्यान पाणी पिऊन झाल्यानंतर आत राहिलेलं खोबरं त्यांनी काढून आणायला सांगितलेलं असतं. निसर्गाने आपल्याला भरभरून दिलं आहे. ते असंच फेकून का द्या? हा त्यामागचा साधा विचार. जेवणानंतर साधारण अध्र्या तासाने मेधाताई स्वतच मोठयाने घोषणा द्यायला सुरूवात करतात.  सुखकर्ता नावाच्या इमारतीसमोरून जाताना, तुमचे शासकही सुखकर्ता असावेत यासाठी विचार करून मत द्या हे प्रसंगावधानही फक्त त्यांनाच सुचते.  इमारतींमधला प्रचार संपल्यावर लागूनच असलेल्या झोपडपट्टीमध्ये प्रचार सुरू होतो. गेल्या कित्येक वर्षांत आमच्याकडे कुणी ढुंकूनही पाहिले नाही, पण यामुळे आमचं मत तुम्हालाच, अशा प्रतिक्रिया ऐकू येतात. पुढे याच विभागातील संक्रमण शिबिरांतील इमारतींमध्ये राहणारे रहिवासी आपली कागदपत्र घेऊन आलेली असतात. एका कार्यकर्त्यांला  काही लोकांची नावे आणि संपर्क क्रमांक नोंदवून घ्यायला सांगितले जाते. पाचच्या दरम्यान पदयात्रा कन्नमवार नगरला संपूर्ण फेरा मारून चौकात येते. प्रत्येक सोयायटीमध्ये जाऊन कमीतकमी दोन मिनिटं तरी बोलायला हवं, नुसतं मुख्य रस्त्यावरून हात हलवत जाऊन चालणार नाही. नाहीतर ह्या भागात प्रचार पूर्ण झाला, असं म्हणताच येणार नाही, ही त्यांची विचारपध्दती. तीन वाजता सुरू झालेला प्रचार संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालतो. सात तास फक्त पायपीट, सर्वाना जमवून जातीने राज्याबाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांचे आभार मानतात. पुढील दोन चौक सभांसाठी निघण्याची त्यांची धावपळ सुरू होते. बाकी फोनवर बोलू सांगत धावपळीतच तिथून निघतात.
पहिली सभा मानखुर्द येथील सोनापूर येथे पार पडते. शेवटची सभा मंडाला येथे असते. सभेच्या ठिकाणी हजार-दोन हजार लोकांचा समुदाय जमलेला असतो. येथे अभिनेते अयूब खान हेदेखिल मेधाताईंना पाठिंबा दर्शविण्यासाठी आलेले असतात. मंचावर उपस्थित सर्वाची भाषणे झाल्यावर मेधाताई आपल्या वीस मिनिटांच्या भाषणात फेरीवाले, झोपडपट्टी आणि स्थानिक प्रश्नांबाबत विद्यामान लोकप्रतिनिधींवर हल्ला चढवतात. रात्रीचे साधारण साडेदहा वाजलेले असले तरी मेधाताईंचा दिवस संपायचा असतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2014 2:01 am

Web Title: loksatta reporter cover aap candidate medha patkar campaigning
Next Stories
1 दुसऱ्या टप्प्यात दिग्गजांचे भवितव्य ठरणार
2 काँग्रेसच्या पाठिंब्यावर तिसऱ्या आघाडीची सत्ता
3 महत्त्वाचे : पक्षांतर्गत विरोधकही प्रिया दत्त यांच्या प्रचारात
Just Now!
X