भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी हे वेगळेच व्यक्तिमत्त्व. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रभावाने थेट राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली, मात्र पक्षांतर्गत हितशत्रूंमुळे दुसऱ्यांदा संधी हुकली. बिनधास्त स्वभाव आणि त्याला तशीच कृतीची जोड यामुळे वाद निर्माण झाले. मनसेशी जवळीक करण्याचा प्रयत्न केल्यानंतर शिवसेनेकडूनही कडाडून टीका झाली. पण या साऱ्याची त्यांनी कधीच पर्वा केली नाही. जातीपातीचे राजकारण बाजूला ठेवून देशाच्या विकासाचा विचार अधिक करण्याची त्यांची भूमिका आहे. प्रचार सभांमध्ये ते औद्योगिक विकास, जागतिक अर्थकारण, शेती हेच मुद्दे मांडत असतात.

नागपूरमधील गजबजलेल्या महाल परिसरातील ‘भक्ती’ निवासस्थान हा ‘गडकरीवाडा’ म्हणूनच प्रचलित. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचे निवासस्थान. गडकरी लोकसभेची निवडणूक लढवीत असल्याने सकाळी आठपासून ते रात्री एक-दीडवाजेपर्यंत कार्यकर्त्यांची गजबज सुरूच असते. गडकरींनी शुक्रवारी सकाळी नाष्टा उरकला आणि पावणेनऊच्या सुमारास ‘आऊटलँडर’ गाडीत बसले. सोबत अंगरक्षक व त्यांची आणखी एक गाडी. गाडय़ा ‘मिट्टी खदान’ या ठिकाणी पोचतात. तेथे गडकरींचा कटआऊट, पक्षाचे झेंडे वगैरे लावून सजविलेल्या उघडय़ा जीपमध्ये गडकरी चढतात. रणरणत्या उन्हाचा त्रास कमी व्हावा, म्हणून चेहऱ्याला सनक्रीम लावले जाते. अपुरी झोप, दगदगीमुळे चेहऱ्यावर थकवा असला तरी कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या माळा लावून घोषणा सुरू केल्यावर सर्वामध्येच उत्साह संचारतो आणि रॅली सुरू होते. मुस्लीम आणि अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्या या मतदारसंघात मोठी असल्याने त्यांची वस्ती अधिक असलेल्या या भागात रॅलीची सुरुवात होते. अरुंद गल्ल्यांमधून गाडय़ांच्या ताफ्याचा प्रवास सुरू होतो. किमान दीड-दोनशे कार्यकर्ते सोबत असतात आणि नाक्या-नाक्यावर त्यांचा जथ्थाही तयार असतो. बँड वाजत असतो. ‘आप’च्या टोप्यांप्रमाणे गडकरी यांच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावरही ‘व्होट फॉर गडकरी’ लिहिलेल्या भगव्या टोप्या असतात. गडकरी आपल्या दारापुढे आल्याने घरातून महिला, मुलांसह सर्वचजण कुतूहलाने पाहत असतात आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षांव केला जातो. केवळ भाजप कार्यकर्तेच नव्हे, तर अगदी मुस्लीम समाजाच्या घरांमधूनही त्यांचे हारतुरे घालून स्वागत व अभिवादन केले जाते. कार्यकर्ते व अन्य मंडळींकडून बुंदीचे लाडू, पेढे, मिठाई, सरबत आदींचे वाटप रॅलीमध्ये सुरू असते. राठोड लेआऊट भागात सत्पालजी महाराजांच्या शिष्यगणांकडूनही स्वागत केले जाते. जाफरनगर परिसरात उच्चशिक्षित मुस्लीम बरेच राहतात. तेथेही गडकरींचे स्वागत होते. पावणेबाराच्या सुमारास झिंगाबाई टाकळी भागातील गल्लीबोळांमध्ये रॅली फिरत असते. उघडय़ा जीपमध्ये उन्हाचे चटके बसत असतात. त्यामुळे अधूनमधून ताक, लिंबू सरबत, नारळ-पाणी घेत गडकरींची रॅली दुपारी बाराच्या सुमारास थांबते. सकाळी रॅली, दुपारी अन्य मतदारसंघांत प्रचारसभा आणि रात्री नागपुरात सभा हा दिनक्रम. त्यामुळे रॅलीनंतर गाडीत बसून गडकरी थेट विमानतळावर जातात. तेथील व्हीआयपी प्रतीक्षालयात जाऊन गडकरी रॅलीमध्ये खराब झालेले कपडे बदलतात आणि पुन्हा कडक इस्त्रीचा पांढरा सदरा व लेंगा घालून आधीच तयार ठेवलेल्या चार सीटरच्या छोटेखानी हेलिकॉप्टरमध्ये जाऊन बसतात. साडेतीन तास उन्हात काढल्यावर हीच काय ती क्षणभर विश्रांती. जेवणाचा डबा आणून ठेवलेला असतो. हेलिकॉप्टर उड्डाणाची तयारी होईपर्यंत पोळी-भाजी आणि काकडीच्या फोडींवर मोजक्या पाच-सात मिनिटांमध्ये जेवण संपते.  रोजच्या दगदगीने तब्येत काहीशी बिघडल्याने जेवणानंतर थोडा त्रास होतो. तासन्तास उन्हात उभे राहिल्याने पायावरही सूज आलेली असते. त्यामुळे पुढील मोकळ्या सीटवर पाय वर ठेवून काही मिनिटे विश्रांती होऊन गप्पा सुरू होतात. गोंदिया जिल्ह्य़ातील गोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात नाना पटोले यांच्या प्रचारासाठी सभा ठेवलेली असते. गडकरी तेथे पावणेदोनला पोचतात. केंद्र सरकारच्या भ्रष्टाचारावर कोरडे ओढल्यावर परकीय चलनदर, डिझेल-पेट्रोलमध्ये इथेनॉलमिश्रण यासह अनेक विषय भाषणात येतात, महागाई सहा महिन्यांत कमी करण्याचे आश्वासन दिले जाते. भाषण संपल्यावर पुन्हा पावणेतीनला हेलिकॉप्टर निघते भंडारा रस्त्यावरील वरठीच्या दिशेने. हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा काही क्षणांचा विसावा घेतल्यावर ते ताजेतवाने होतात. हेलिकॉप्टर सव्वातीनला वरठीला उतरते. सभेच्या ठिकाणी गेल्यावर फटाक्यांची आतषबाजी, बँड जोरात वाजत असतो. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यावर पुन्हा केंद्र सरकारवर टीका केल्यावर सत्ता आल्यास दोन लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा पुरविण्याचे आश्वासन दिले जाते. सभा आटोपल्यावर ‘सनफ्लॅग’ स्टील या एका मोठय़ा स्टील कारखान्याच्या अतिथिगृहात गाडय़ांचा ताफा पोचतो. तेथे चहापाण्याची व्यवस्था केलेली असते. गरमागरम बटाटावडे, भजी, सुकामेवा, वेफर्स, चहा असा बेत असतो. मधुमेह आणि प्रचाराची दगदग असल्याने आहाराबाबत काहीसे काटेकोर झालेले गडकरी रोज प्राणायामही करतात. पण वडय़ाचा मोह आवरत नाही. वडा खाल्ल्यावर अनेक साखर कारखान्यांचे आश्रयदाते असलेले गडकरी बिनसाखरेचा चहा घेतात. लगेच गाडय़ा निघतात हेलिपॅडच्या दिशेने. हेलिकॉप्टरमधील प्रवासात ‘हे नागझिऱ्याचे जंगल, सनफ्लॅग प्रकल्प, अडानी विद्युत प्रकल्प, अमुक तलाव..’ अशी माहिती ते देतात.  गप्पा सुरु असतानाही पुढील सभेचे ठिकाण असलेले मौदा ओलांडून पायलट पुढे जातो. तेव्हा ते त्याला मौदा मागे गेल्याची सूचना करतात. काही तांत्रिक चुकीमुळे हेलिकॉप्टर पुढे गेले, तरी परिसर माहीत असल्याने हेलिकॉप्टर बरोबर मौदा येथे उतरते. रामटेक मतदारसंघातून शिवसेनेचे कृपाल तुमाने निवडणूक लढवीत असून त्यांच्या प्रचाराला गडकरी इथे आलेले असतात. भाषणात सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडल्यावर त्यांच्याकडून निवडणुकीत होत असलेल्या पैशांच्या वापराचा उल्लेख गडकरी करतात. ‘गरिबाघरी लक्ष्मी येण्याची हीच वेळ, देशी-विदेशी, साडी-चोळी नाकारू नका, पण मत मात्र महायुतीच्या उमेदवारालाच द्या,’ हे प्रत्येक सभेप्रमाणे येथेही सांगितले जाते. विशेष म्हणजे सभेच्या मागील बाजूला असलेल्या चहाच्या टपऱ्यांवर मात्र चांगला धंदा सुरू असतो. ‘सभेला गेला नाही?’ असे विचारल्यावर ‘साहेब, आम्ही सभेला गेल्यावर तुमच्यासारख्याला चहा कोण देणार, गरिबाला धंदाच बघावा लागतो’ असे उत्तर चहावाला देतो. जोर कोणाचा विचारल्यावर चलाखीने शिवसेना-भाजपचा आहे, असेही तो सांगतो. काँग्रेसच्या उमेदवाराचे नावही त्याला आठवत नाही. सभेनंतर पुन्हा हेलिपॅडवर. प्रत्येक गावातील हेलिपॅडप्रमाणेच येथेही गावातील म्हाताऱ्या-कोताऱ्यांसह लहान मुलांची गर्दी झालेली असते. गावात अनेक वर्षांनी हेलिकॉप्टर आल्याने अप्रूप. राजकीय कार्यकर्ते निरोप देतात. हेलिकॉप्टरचा पंखा भिरभिरू लागल्यावर पाणी मारले असले तरी धुरळा उधळतो, चुरचुरते डोळे चोळत ही गर्दी ओरडत असते, हात उंचावत असते, लहान मुले टाळ्या पिटतात. गडकरीही हेलिकॉप्टर उंचावर जाईपर्यंत अभिवादन करीत असतात. लहान-थोरांची कौतुकमिश्रित नजर नेत्याच्या दिशेने भिरभिरत असते आणि त्यात बसलेल्या नेत्याची नजरही धुरळ्यातून गर्दीचा वेध घेत असते.. तो मनातल्या मनात विचार करीत असतो, या मातीतून कमळ फुलणार का? सत्तेच्या सारिपाटावर आपल्या बाजूने दान पडणार का? आपल्या राजकीय खेळ्या फळाला येतील?ोशाआकांक्षांना धुमारे फुटतील?.. अशा अनेक प्रश्नांचा धुरळा त्यांच्या मनात उडत असतो.