लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र, हरियाणा आणि आसाममध्ये नेतृत्व बदलण्याची काँग्रेसचीच योजना दिसते. आम्ही महाराष्ट्रात नेतृत्व बदल करण्याची मागणी केलेली नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसमधूनच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्याची मागणी सुरू झाली होती. नेतृत्व बदलाची हवा असतानाच काँग्रेस नेत ए. के. अ‍ॅन्टोनी आणि अहमद पटेल यांनी गुरुवारी शरद पवार यांची भेट घेतल्याने या चर्चेला वेग आला. शरद पवार यांनी शुक्रवारी टाकलेल्या गुगलीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा अस्थिरतेचे वातावरण तयार झाले. महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये नेतृत्व बदलाची काँग्रेसचीच योजना दिसते, या पवार यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त होते.
विशेष म्हणजे काँग्रेस नेते ए. के. अ‍ॅन्टोनी आणि अहमद पटेल यांनी शुक्रवारी सकाळी पवार यांची दोनदा भेट घेऊन चर्चा केली. गुरुवारच्या बैठकीत पवार यांनी काही मुद्दे स्पष्टपणे उपस्थित केले होते. त्याबाबतही शुक्रवारच्या बैठकीत चर्चा होऊन काँग्रेस नेत्यांनी स्पष्टीकरण दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. काँग्रेस नेतृत्वाकडून संकेत दिल्यावरच मुंबईत परतल्यावर पवार यांनी नेतृत्व बदलाचे संकेत दिल्याचे सांगण्यात येते. बदल झाल्यास  विधिमंडळाचा नवा नेता कोण असेल, या प्रश्नावर तो काँग्रेसचा प्रश्न आहे, असे उत्तर पवार यांनी पत्रकारांना दिले.
नेतृत्वाची काँग्रेसची गळ
 विधानसभा निवडणुकीचे नेतृत्व आपणच करावे, अशी काँग्रेसचीही इच्छा आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडीचे नेतृत्व करू, पण मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्घेत आपण नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
मनसेची ताकद वाढेल
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चित्र वेगळे असते. विधानसभा निवडणुकीत मनसेला पाठिंबा वाढेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. मनसेची ताकद वाढून मतविभाजन झाल्याशिवाय आघाडीचा फायदा होत नाही, हे ओळखूनच पवार यांनी मनसे वाढेल यावर भर दिला आहे.
मुख्यमंत्री समर्थक आशावादी
नेतृत्व बदल करायचे झाल्यास काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक सोमवारी अथवा मंगळवारी बोलाविली जाण्याची शक्यता आहे. नेतृत्व बदलण्याची चर्चा असली तरी पृथ्वीराज चव्हाण यांनाच कायम ठेवले जाईल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे.