काँग्रेस उमेदवारांची नावे निश्चित करण्याची प्रक्रिया नवी दिल्लीत सुरू झाली. पक्षाच्या वाटय़ाला २६ जागा आल्याने पक्षश्रेष्ठींचे काम थोडे हलके झाले. उमेदवारांची नावे निश्चित करणे म्हणजे गटबाजी, रुसवे-फुगवे, झिंदाबाद- मुर्दाबाद हे आलेच. काँग्रेसमध्ये गोंधळ झाल्याशिवाय जानही येत नाही. पक्षाचे सध्या १७ खासदार आहेत. आपल्याला पुन्हा संधी मिळावी, अशी अपेक्षा प्रत्येकालाच असते. पण काही विद्यमान खासदारांना नारळ देण्याची पक्षश्रेष्ठींची योजना आहे. काँग्रेसमध्ये सुरेश कलमाडी आणि अशोक चव्हाण ही दोन नावे सध्या वादग्रस्त ठरली आहेत. ‘आदर्श’ घोटाळ्यात अडकलेले अशोक चव्हाण हे अद्यापही न्यायालयाचे खेटे घालत आहेत. राज्यपालांनी खटला दाखल करण्यास परवानगी नाकारली म्हणजे अर्धी लढाई जिंकली, असा बहुधा समज अशोकरावांचा झालेला दिसतो. राज्याच्या राजकारणात सध्या तरी संधी नसल्याने दिल्लीत जावे, असे त्यांच्या मनात आले आणि पक्षाकडे नांदेडमधून उमेदवारी मिळावी म्हणून मागणीही केली. मंगळवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीचा विषय आला, तेव्हा पक्षात अर्थातच दोन मतप्रवाह होते. अशोकरावांना उमेदवारी दिल्यास विरोधकांना भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्दय़ावर आयतीच संधी मिळेल, असा पक्षात एक मतप्रवाह आहे. परिणामी अशोकरावांच्या उमेदवारीचा निर्णय सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय निवडणूक समितीवर सोपविण्यात आला. पुण्याचे सुरेश कलमाडी काही माघार घेण्याच्या तयारीत नाहीत. तुरुंगाची हवा खाऊन आले तरी आपल्यालाच उमेदवारी मिळावी, असा त्यांचा आग्रह होता. पण पक्षाने नकार दिल्याने त्यांनी आपली पत्नी मीरा यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी पुढे रेटली आहे. काहीही झाले तरी पुण्याची काँग्रेसची जहागिरी आपल्याच घरात राहावी, असा त्यांचा प्रयत्न आहे. कलमाडी किंवा त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यास पराभव नक्की, असा दावा पुण्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते ठामपणे करतात. घोटाळ्यात तुरुंगाची हवा खाऊनही कलमाडी यांच्याबद्दल पक्षाला एवढे प्रेम का, अशी चर्चा काँग्रेसच्या गोटात सुरू झाली. राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात काँग्रेस नेतृत्वाच्या निकटवर्तीयांचाही फायदा झाल्याचे बोलले जाते. ही नस ओळखूनच कलमाडी पक्षाला वेठीस तर धरत नाहीत ना, असा एकूणच चर्चेचा सूर आहे.