नरेंद्र मोदी यांनी तेरा वर्षे सहकारी मंत्री, आमदार-खासदारांना विश्वासात न घेता केवळ एकाधिकारशाहीने गुजरातमध्ये कारभार केला आणि त्यातून गुजरातचे मॉडेल आणले. संपूर्ण देशात विकासामध्ये गुजरात सर्वात पुढे असल्याचा डांगोरा पिटला जातो. तो तद्दन खोटा असून आजही गुजरातपेक्षा महाराष्ट्र विकासात पुढे आहे. त्यावर जाहीर चर्चा करण्यााची आपली तयारी असल्याचे आव्हान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपला दिले.
सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. दोन दिवसांपूर्वी मोदी हे सोलापुरात पॉवरग्रीड कॉर्पोरेशनच्या प्रकल्पासह सोलापूर-पुणे महामार्गाच्या चौपदरीकरण कामाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आले होते. त्या वेळी मुख्यमंत्री चव्हाण हे देखील उपस्थित होते. त्या वेळी मोदींनी केलेल्या भाषणाचा खरपूस समाचार मुख्यमंत्री चव्हाण यांनी घेतला. ते म्हणाले, हे दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुशीलकुमार शिंदे हे केंद्रात मंत्री असताना मंजूर करून आणले व पूर्ण केले. असे असताना या दोन्ही प्रकल्पांच्या लोकार्पणाप्रसंगी मोदी यांनी त्याचा साधा उल्लेखही केला नाही. सुशीलकुमारांनी ही दोन्ही कामे केल्याचे मान्य करण्याची दानत मोदींकडे नाही. या प्रकल्पांची सुरुवात सुशीलकुमारांनी केली, एवढे तरी मोदींनी म्हणायला हवे होते. केवळ राजकीय हेतूने मोदींनी सोलापुरात भाषण केल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. राज्यात वीजनिर्मितीसाठी कोळसा, गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली होती. त्याची साधी दखलही न घेता केवळ राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला.