विधान परिषदेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सोमवापर्यंत असली तरी सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये ही जागा कोणी लढवायची यावर अद्यापही एकमत झालेले नाही. काँग्रेसला अपशकून करण्याकरिता राष्ट्रवादी प्रसंगी ‘राहुल बजाज पॅटनर्’चा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे आघाडीतील वादातून त्याचा लाभ घेण्याचा शिवसेना-भाजपचा प्रयत्न आहे.
विनायक राऊत यांची लोकसभेवर निवड झाल्याने त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे विधान परिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. संख्याबळाच्या आधारे आघाडीचा उमेदवार सहजपणे निवडून येण्यात काहीच अडचण येणार नाही. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीत ही जागा कोणी लढवायची यावर एकमत झालेले नाही.
ही जागा कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीला मिळाली पाहिजे, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली आहे. मात्र गेल्या वेळी द्वैवार्षिक निवडणूक बिनविरोध होण्याकरिता आम्ही एक जागा कमी लढविली होती याकडे काँग्रेसचे प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी लक्ष वेधले. यापूर्वी आम्ही काँग्रेसला दोनदा जागा सोडली होती. आता आमचाच दावा आहे, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. काँग्रेस-राष्ट्रवादीतील वादात विरोधकांचाच उमेदवार निवडून येईल, असा विश्वास भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काय करणार ?
काँग्रेसने ही जागा हट्टाने मिळवीलच तर ती पाडण्याची व्यवस्था राष्ट्रवादीकडून होऊ शकते. प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर झालेल्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने भाजप-शिवसेनेच्या मदतीने उद्योगपती राहुल बजाज यांना निवडून आणले होते व काँग्रेसला एकटे पाडले होते. विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असतानाच आमदारांसाठी संधी आल्याने ही पोटनिवडणूक ‘अर्थपूर्ण’ होऊ शकते.
मुख्यमंत्री लक्ष्य
काँग्रेसमध्ये सारे काही आलबेल नाही. कामे होत नसल्याने आमदारमंडळी मुख्यमंत्र्यांवर नाराज आहेत. काँग्रेसने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली तरी पक्षातूनच दगाफटका होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जाते. कारण मध्यंतरी झालेल्या पोटनिवडणुकीत पुरेसे बहुमत असतानाही काँग्रेसच्या मधू जैन या फक्त सहा मतांनी निवडून आल्या होत्या. शिवसेनेने या पोटनिवडणुकीत रस घेऊ नये, असा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न सुरू असल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात येते.