भाजप आणि राष्ट्रवादी या मित्रांनी जागा वाढवून मिळाव्यात म्हणून घोशा लावल्याने एक पाऊल मागे घ्यायचे का, असा प्रश्न काँग्रेस आणि शिवसेनेसमोर उभा राहिला आहे. सद्यस्थितीत काँग्रेस राष्ट्रवादीवर तेवढा अवलंबून नसला तरी शिवसेनेला मात्र भाजपशिवाय पर्याय नसल्याने कोण किती ताणून धरते यावर सारे अवलंबून आहे.
निम्म्या जागा मिळाल्याच पाहिजेत, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुरू करून काँग्रेसवर दबाव वाढविला आहे. दुसरीकडे जागावाटपाचे जुने सूत्र बदलले जावे, अशी भाजपची भूमिका आहे. बदलत्या परिस्थितीत सध्याचे जागावाटपाचे सूत्र मान्य नाही, हा संदेश भाजपने दिला आहे. शिवसेनेकडून दुय्यम वागणूक मिळणार असल्यासे युती तोडा अशी मागणी भाजपच्या बैठकीत करण्यात आली. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-शिवसेना या पारंपारिक मित्रांमध्ये आगामी निवडणुकीच्या निमित्ताने धुसफूस सुरू झाली आहे. किमान १५ जागा वाढवून मिळाल्या पाहिजेत, असा भाजपचा आग्रह राहणार आहे. अर्थात, युती अथवा आघाडीमध्ये अद्यापही जागावाटपाच्या वाटाघाटी सुरू झालेल्या नाहीत. सध्या जी काही चर्चा सुरू आहे ती प्रसार माध्यमांच्या मार्फतच होत आहे.  
जागावाटपाच्या या घोळात शिवसेनेची परिस्थिती जास्त अवघडल्यासारखी झाली आहे. मोदी लाटेत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. विधानसभेसाठी सध्या वातावरण युतीला अनुकूल आहे. बदलत्या परिस्थितीत भाजपकडून जास्त जागांची मागणी होणार ही खूणगाठ ओळखून शिवसेनेचे नेते आहेत. या शिवाय महायुतीत आठवले, जानकर, शेट्टी, मेटे या नेत्यांच्या पक्षांना सामावून घ्यायचे आहे. सद्यस्थितीत भाजपशी घरोबा कायम ठेवल्याशिवाय शिवसेनेला यश मिळू शकणार नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद खुणावू लागले असले तरी भाजप हे सहजासहजी सोडणार नाही. भाजपला जास्त जागा सोडल्यास पुढे अंकगणित जमले पाहिजे यावर शिवसेनेचा भर आहे. युतीत वाटय़ाला येणाऱ्या पण आतापर्यंत निवडून आलेल्या नाहीत किंवा निवडून येण्याची शक्यता नाही अशा जागा सोडण्याचा शिवसेनेचा मानस आहे. भाजपने आकडय़ांवर फारच भर दिल्यास शिवसेनेला काही जागा सोडण्याशिवाय पर्याय राहणार नाही. सोडण्यात येणाऱ्या जागा भाजपच्या वाटय़ाला जाऊ नयेत तर अन्य मित्र पक्षांमध्ये विभागल्या जाव्यात यावर शिवसेनेचा भर राहिल, असे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले.
राष्ट्रवादीला जास्त जागा देण्यास महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचा सक्त विरोध आहे. निम्म्या जागा देण्याऐवढी राष्ट्रवादीची ताकद वाढलेली नाही, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र दिल्लीचा सूर कोणता राहील याबाबत काँग्रेस नेते साशंक आहेत. केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिल्यास जास्त जागा राष्ट्रवादीला सोडाव्या लागतील, असे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले.