हिमाचल प्रदेशमधील मंडी हा मतदारसंघ मतदार संख्येबाबत राजस्थानमधील बारमेर पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा आहे. सर्वसाधारणपणे राजघराण्यातील व्यक्तींचे या मतदारसंघावर प्राबल्य राहिले आहे. काँग्रेस असो वा भाजप राजघराण्यातील व्यक्तींना येथून संधी मिळाली आहे. दूरसंचार घोटाळ्यात नाव आलेले सुखराम यांनीही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. साधारणत: कोणत्या एका पक्षाला हा मतदारसंघ सातत्याने अनुकूल राहिलेला नाही. गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी भाजप उमेदवारावर निसटता विजय मिळवला होता. त्यानंतर पोटनिवडणुकीत वीरभद्र यांच्या पत्नी प्रतिभासिंह यांनी मोठय़ा फरकाने विजय मिळवला होता. त्या राजघराण्यातील असल्याने राजा विरुद्ध प्रजा असे लढतीला स्वरूप देण्याचा प्रयत्न भाजपने चालवला आहे. भाजपने रामस्वरूप शर्मा यांना संधी दिली आहे. याखेरीज आप आणि माकप यांचेही उमेदवार ७ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. पक्षांतर्गत गटबाजी ही काँग्रेस आणि भाजपसाठी चिंतेची बाब आहे. राज्यातील लोकसभेच्या चारही जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, तर मंडी हा कॉंग्रेसचा गड वाचवण्यासाठी वीरभद्र यांनी ताकद पणाला लावली आहे. विकासाचा अभाव हा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा आहे.