काँग्रेसच्या सावलीत वाढलेले अन् आता राष्ट्रवादीकडून उमेदवारी स्वीकारलेले धनंजय महाडिक व काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतलेले संजय मंडलिक या दोन्ही आयात उमेदवारांत कोल्हापूरच्या लोकसभेचा राजकीय आखाडा यंदा रंगला आहे. एकमेकांचा पट काढण्याचा डाव सध्या खेळला जात असून दोन्ही पक्षांकडून बलदंड ताकद लावली गेल्याने राजकीय आखाडय़ाचा निकाल वर्तविणे कठीण बनले आहे. मतदानापर्यंत दम टिकविण्याची क्षमता असणारा उमेदवार बाजी पलटवू शकतो, असे आताचे चित्र आहे.     
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्य़ातील कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही जागा म्हणजे भळभळणारी जखम ठरल्या आहेत. याला कारण गेल्यावेळेच्या निवडणुकीत सदाशिवराव मंडलिक व राजू शेट्टी या दोघांनीही पवार आणि राष्ट्रवादीकडून हे दोन्ही मतदारसंघ हिसकावून घेतले. यामुळे व्यथित झालेल्या पवारांनी यंदा सुरुवातीपासूनच आपली धोरणी चाल सुरू केली आहे. त्यातूनच काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आमदार महादेवराव महाडिक यांचे पुतणे धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली आहे.
दुसरीकडे खासदार सदाशिव मंडलिक यांनी मुलगा संजय यांच्या हाती शिवसेनेचे धनुष्य देत पवार व राष्ट्रवादीवर एकाच वेळी निशाणा साधला आहे. सलग चौथ्यांदा खासदारकी टिकवून ठेवलेल्या मंडलिक गटाची मूळची ताकद तिला भाजपा, शिवसेना, रिपाइं, स्वाभिमानी संघटनेची मिळालेली भक्कम साथ आणि मोदींची लाट ही त्यांची जमेची बाजू ठरलेली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्याने संजय मंडलिक यांनी अगोदरपासूनच अवघा जिल्हा पिंजून काढला असून त्याचा चांगला फायदा मिळत आहे. यामुळे महाडिक-मंडलिक लढतीत आजतरी मंडलिकांची बाजू काहीशी वरचढ आहे.
दरम्यान या मतदारसंघाला काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन प्रमुख पक्षातील संघर्षांचीही किनार आहे. आघाडीतील अंतर्गत संघर्षांचा हा नेमका मुद्दा मंडलिकांच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत.

खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे व्यापक कार्य, महायुतीची साथ व मोदी लाटेचा फायदा निश्चितपणे मिळणार आहे. मंडलिकांवर टीका करणाऱ्या महाडिक काका-पुतण्याने केलेली पाच कामे सांगावीत. दहीहंडी, झिम्मा-फुगडी स्पर्धा भरविणे म्हणजेच धनंजय महाडिकांची विकासाची संकल्पना आहे काय ?    
संजय मंडलिक (महायुती)

जनहिताच्या कामांना नेहमीच प्राधान्य दिल्याने आम आदमीची भक्कम साथ लाभत आहे. त्यातच विजयाच्या दृष्टीने मतदारसंघाची घटनात्मक बांधणीही आम्ही उत्तम केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते मनापासून प्रचारात उतरल्याने वातावरण अनुकूल आहे. जिल्हा परिषदेत जाण्यास वेळ नाही अशा संजय मंडलिकांना जनता दिल्लीत मुळीच पाठविणार नाही.
धनंजय महाडिक (आघाडी)