केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित विजयी झाल्यास १६व्या लोकसभेतील ते सर्वात ज्येष्ठ सदस्य ठरणार आहेत. आतापर्यंत लागोपाठ नऊ वेळा निवडून गेलेले गावित दहाव्यांदा निवडून जाण्यासाठी सज्ज झाले असले तरी राष्ट्रवादीचे डॉ. विजयकुमार गावित यांनी माणिकरावांना यंदा पराभूत करायचेच, असा निर्धार केला आहे.  नंदुरबार हा आदिवासीपट्टा काँग्रेसचा पांरपारिक बालेकिल्ला मानला जातो. प्रत्येक निवडणुकीत प्रचाराची सुरुवात इंदिरा गांधी या नंदुरबारमधून करीत. सोनिया गांधी या राजकारणात सक्रिय झाल्या तेव्हा त्यांची पहिली जाहीर सभा नंदुरबारमध्येच झाली होती. राज्याच्या स्थापनेनंतर नंदुरबार आणि सांगली हे दोनच लोकसभा मतदारसंघ असे आहेत की काँग्रेस उमेदवाराचा कधीच पराभव झालेला नाही. १९८१ मध्ये सुरुपसिंह नाईक यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश झाला आणि त्यांना लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत माणिकराव गावित विजयी झाले. १९८१ पासून २००९ पर्यंत सतत नऊ वेळा त्यानंतर गावित यांच्या विजयाची परंपरा कायम राहिली आहे. २००९ मध्ये सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून सोनिया गांधी, लालकृष्ण अडवाणी, प्रणव मुखर्जी यांच्यासह सर्व सदस्यांना सदस्यत्वाची शपथ हंगामी अध्यक्ष म्हणून गावित यांनी दिली होती. १५व्या लोकसभेत गावित आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वासुदेव आचार्य हे दोन सदस्य नऊ वेळा निवडून आले होते. आचार्य यांनी पुन्हा लोकसभा लढणार नाही, असे जाहीर केले आहे. यामुळेच  पुन्हा निवडून आल्यास सर्वात ज्येष्ठ सदस्य गावित ठरतील. लोकसभेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे इंद्रजित गुप्त यांनी लागोपाठ ११वेळा निवडून येण्याचा विक्रम केला. अटलबिहारी वाजपेयी, सोमनाथ चटर्जी आणि पी. एम. सईद हे दहा वेळा निवडून आले आहेत.

कडवे आव्हान
माणिकराव गावित यांना आठ वेळा निवडून येण्यात कधीच अडचण आली नाही. मतदारसंघातील गावे आणि पाडय़ांशी सतत संपर्कात असणारे किंवा मतदारांना नावाने ओळखण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गावित यांचा २००९च्या निवडणुकीत चांगलाच घाम निघाला होता. राष्ट्रवादीचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आपल्या भावाला माणिकरावांच्या विरोधात उतरवून सारी शक्ती पणाला लावली. परिणामी गावित यांना ४० हजारांचे मताधिक्य मिळाले. नंदुरबारमध्ये दोन गावितांमधून अजिबात विस्तवही जात नाही. यंदा माणिकरावांना पराभूत करण्याकरिता राष्ट्रवादीचे डॉ. विजयकुमार गावित यांनी आपली कन्या हिना यांनाच भाजपच्या वतीने रिंगणात उतरविण्याचे ठरविले आहे. भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत गावित यांच्या कन्येचे नाव होते, पण यादी प्रसिद्ध करताना ते नाव मागे घेण्यात आले. पक्षाच्या मंत्र्याची मुलगी भाजपच्या वतीने लढते यातून चुकीचा संदेश जाईल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी डॉ. गावित यांच्या निदर्शनास आणून दिले.