राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पराभव दिसू लागल्याने त्यांनी जातीय कार्ड खेळण्याचा डाव आखला आहे, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली. राष्ट्रवादी व काँग्रेसचे अनेक बडे नेते आमच्या संपर्कात असून येत्या महिनाभरात त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, असा दावा तावडे यांनी केला. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत का, या प्रश्नावर बोलण्याचे तावडे यांनी टाळले. मात्र चांगली प्रतिमा असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच भाजपमध्ये प्रवेश देण्यात येईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले.
शरद पवार सध्या मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. दिवसभर ते अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतात. पराभव समोर दिसत असल्याने जातीय कार्डाचा वापर करण्यासाठी शरद पवार यांनी विविध धर्माच्या लोकांना आरक्षण देण्याची मागणी पुढे रेटली आहे. मात्र त्यांची योजना सफल होणार नाही, असे तावडे म्हणाले. राज्यात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल, या प्रश्नावर बोलण्याचे तावडे यांनी टाळले. मुंख्यमंत्रीपदाचा उमेदवार महायुतीचा असेल, असे मोघम उत्तर त्यांनी दिले.  भीषण दुष्काळ पडण्याची भीती असताना राज्य शासनाला देणे-घेणे नाही. दुष्काळ निवारण यंत्रणा उभी करण्याऐवजी मुख्यमंत्री चव्हाण खुर्ची वाचवण्यासाठी दिल्लीत चकरा मारत आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री सुनील तटकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे सिंचन घोटाळ्यात दोषी आहेत. मुख्यमंत्री चव्हाण यांन कारवाई केल्यास अजित पवार व तटकरे तुरुंगात जातील.