भारताचे संरक्षणमंत्री ए के अ‍ॅन्टनी, आपचे अरविंद केजरीवाल हे पाकिस्तानचे दलाल असून भारताचे शत्रू असल्याची टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केली.
तीन ‘एके’ पाकिस्तानचे हात बळकट करीत असून त्यांपैकी एक एके-४७ काश्मीरमध्ये निरपराध जनतेचा रक्तपात घडवत आहे. दुसरे देशाचे संरक्षणमंत्री एके अ‍ॅन्ट२नी हे पाकिस्तानी सैनिकांच्या वेशातील अतिरेक्यांनी भारतीय जवानांची हत्या केल्याचे संसदेत सांगतात, तर दुसरीकडे भारतीय जवानच पाकिस्तानी सैन्याने हल्ला केल्याचे ठासून सांगत असताना संरक्षणमंत्री असे विधान करून कुणाचा फायदा करीत आहेत, असा प्रश्नही मोदींनी उपस्थित केला.
पक्षाच्या बैठकीत बोलताना मोदींनी आपच्या अरविंद केजरीवाल यांच्यावरही टीका केली. दिल्लीचा कारभार पाहताना केवळ ४९ दिवसांत राजीनामा देणारे अरविंद केजरीवाल हे तिसरे एके-४९ असल्याची टीका मोदींनी केली. त्यांच्या पक्षाच्या संकेतस्थळावरील नकाशात काश्मीर हा पाकिस्तानात दाखवला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते काश्मीरमध्ये जनमत चाचणी घेण्याच्या घोषणा देतात. त्यांच्या या कृतीमुळे पाकिस्तानला आनंद होत आहे. त्यामुळे हे भारताचे शत्रू असून पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप मोदी यांनी केला.