महाराष्ट्रात प्रस्थापित साहित्य-सांस्कृतिक चळवळीला संमांतर अशी विद्रोही सांस्कृतिक चळवळ सुरु आहे. या चळवळीवर फुले-आंबेडकरांपेक्षा मार्क्‍सवादाचा अधिक पगडा आहे. नक्षलवादाकडे झुकणारी चळवळ अशा संशयाच्या भोवऱ्यात ही चळवळ सापडली. त्यातून अंतर्गत वाद सुरु झाला. विद्रोहीला फुटीचे तडे गेले. हे तडे बुजवत आता विद्रोहीची  फेरमांडणी सुरु आहे. विद्रोहीचा नवा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. त्यातून फुले-आंबेडकरांच्या बरोबरीने असणाऱ्या मार्क्‍सला दूर करण्यात आले आहे. मात्र अंधश्रद्धेला विरोध करणाऱ्या विद्रोही चळवळीने बहुजनांच्या दैवतांच्या उदात्तीकरणाचा धोका पत्करला आहे. त्यामुळे मार्क्‍स वजा करुनही विद्रोहींची वैचारिक दिशा स्पष्ट होत नाही.  
मराठी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकून स्वतंत्र संमेलने भरविण्याची विद्रोहीने परंपरा सुरु केली.  बुद्ध, कबीर, फुले, आंबेडकर यांच्याबरोबरीने मार्क्‍सवादी विचार प्रमाण मानून चळवळ विस्तारण्याचा प्रयत्न झाला. विद्रोही चळवळीतील काही कार्यकर्त्यांना नक्षलवादी ठरवून तुरुंगात डांबण्यात आले. विद्रोही आणि नक्षलवादी चळवळीतील सीमा रेषा स्पष्ट नसल्यामुळे हा गोंधळ झाला. त्यातच माओवाद्यांनी त्यांच्या नव्या डावपेचात दलित चळवळीला लक्ष्य केले. दलितांवरील अत्याचाराचे भांडवल करा, दलित नेत्यांना उघडे पाडा, असा नवा अजेंडा घेऊन नक्षलवाद्यांनी दलित चळवळीत घुसण्याचे डावपेच आखले. लोकसत्तामधून त्यावर प्रकाश टाकल्यानंतर विद्रोही, डाव्या आणि आंबेडकरी चळवळीतून प्रतिक्रिया आल्या. मात्र सावध झालेल्या विद्रोहीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी नक्षलवादाची चर्चाही नको, म्हणून विद्रोहीच्या जाहीरनाम्यातून मार्क्‍सलाच हद्दपार करुन टाकले.
विद्रोहीची नव्याने मांडणी
विद्रोही सांस्कृतिक चळवळीतील नेते पार्थ पोळके यांनी विद्रोहीची नव्याने मांडणी करणारा जाहीरनामा तयार केला आहे. कोल्हापूर येथे २ व ३ ऑगस्टला विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अधिवेशन होत आहे. त्यात हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अंधश्रद्धा, जातीव्यवस्था, हिंसा, यांचे तात्त्विक व धार्मिक समर्थन करणाऱ्या वैदिक ब्राम्हणी रुढी  टाळून स्त्रिया, बहुजन समाज, आदिवासी व भटके विमुक्त यांच्या सण व उत्सवांना विद्रोही प्रोत्साहन देईल. आदिवासी, भटके, दलित, बहुजनांचे देव आणि दैवते काल्पनिक नाहीत व पारलौकिक नाहीत, ते ऐतिहासिक नायक-नायिका आहेत. त्यांच्या सोबतचे संबंध अनेक रुढी व परंपरांतून व्यक्त होतात. त्यांच्या उपासनेतून अंधश्रद्धा टाळून या दैवतांबद्दल विद्रोहीला आदर आहे, असे नव्या जाहीरनाम्यात म्हटले आहे.