लोकसभा निवडणुकांचा नववा टप्पा आज, सोमवारी पार पडत असतानाच येथील झंडेवाला परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात भाजप नेत्यांचा राबता सुरू झाला आहे. नवव्या टप्प्याचा प्रचार संपल्यानंतर शनिवारी नरेंद्र मोदी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली असतानाच रविवारी भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी संघाच्या वरिष्ठ नेत्यांशी गुफ्तगू केले. चर्चेचा तपशील मात्र गुलदस्त्यातच राहिला.
राजनाथसिंह यांनी रविवारी येथील संघ मुख्यालयात भय्याजी जोशी व सुरेश सोनी यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा केली. १६ मेच्या निकालांनंतरच्या रणनीतीविषयी या बैठकीत चर्चा झाल्याचे समजत असले तरी भाजप आणि संघाच्या सूत्रांनी याबाबत अधिक काही बोलण्यास नकार दिला. निकालांनंतर कोणत्या पक्षाशी हातमिळवणी करायची वगैरे याबाबत चर्चा झाली का, असे विचारले असता, ‘संघ असल्या गोष्टींची चर्चा करत नसतो’, असे उत्तर संघाच्या सूत्रांनी दिले तर संपूर्ण लोकसभा निवडणूक प्रचारात संघ स्वयंसेवकांनी भाजपचा नियोजनबद्ध प्रचार केल्याबद्दल त्याचे आभार मानण्यासाठी राजनाथ यांनी संघनेत्यांची भेट घेतली, यात राजकारण पाहिले जाऊ नये असे भाजपच्या सूत्रांनी स्पष्ट केले.