लोकसभेतील काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. पक्ष प्रवक्ते राज बब्बर यांनी मंत्र्यांचा उर्मटपणा आणि वर्तवणूक पक्षाच्या पराभवाला कारणीभूत असल्याचा ठपका ठेवला आहे. माजी खासदार असलेल्या राज बब्बर यांनी पराभवाची जबाबदारी सामुदायिक आहे. सध्याच्या काळात पक्षाला सावरण्यासाठी सोनिया आणि राहुल यांचा पाठिंबा गरजेचा असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेस कार्यसमितीचे माजी सदस्य जगमितसिंग ब्रार यांनी शुक्रवारी सोनिया आणि राहुल यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. दारुण पराभव पाहता सोनिया व राहुल दोन वर्षे दूर राहिले तरी काही फरक पडणार नाही, असे वक्तव्य केले होते. एकमेकांवर दोष देणे टाळावे अशी सावध प्रतिक्रिया माजी मंत्री मनीष तिवारी यांनी दिली आहे. निकाल विरोधात गेले म्हणजे एकमेकांवर टीका करणे असा होत नाही, असा टोला तिवारींनी ब्रार यांना लगावला. देशापुढे जातीयवाद व मूलतत्त्ववादाचे आव्हान आहे. धर्मनिरपेक्ष पक्ष व व्यक्तींनी एकत्र येणे गरजेचे आहे. सर्वाना सामावून घेण्याच्या राजकारणातील काँग्रेस केंद्रबिंदू असल्याचे तिवारींनी स्पष्ट केले.दरम्यान ब्रार यांना काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबाबत पाच ऑगस्टपर्यंत त्यांना उत्तर द्यायचे आहे.