एकीकडे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मादी यांना जाहीर पाठिंबा द्यायचा आणि त्याचवेळी महायुतीच्या सेना उमेदवार खासदार भावना गवळी यांच्या विरोधात उमेदवार उभा करायचा, या विसंगतीचे समर्थन कसे करणार, या वार्ताहरांच्या प्रश्नाने मनसे उमेदवाराची आणि नेत्यांची पंचाईत झाली.
मनसेने यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात वाशीमच्या राजू राजे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. विदर्भात मनसे हीच एकमेव जागा लढवत आहे. या मतदारसंघात सेनेच्या भावना गवळी उभ्या असताना मनसेने उमेदवार कसा काय उभा केला, असा प्रश्न मनसे उपाध्यक्ष आनंद एंबडवार, उमेदवार राजू राजे पाटील आणि मनसे जिल्हा अध्यक्ष राजू उंबरकर यांना विचारला, तेव्हा आम्हाला पक्ष मजबूत करायचा आहे. मनसेला मत म्हणजे मोदींना मत, अशी भित्तीपत्रके सोशल मीडियाव्दारे प्रसारित होत आहेत.राज यांच्या छायाचित्रांसोबत मोदींचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे, असे विचारता भित्तीपत्रकांशी आमचा संबंध नसल्याचा खुलासा यावेळी मनसे नेत्यांनी केला. भावना गवळी यांचे पूर्वाश्रमीचे पती कॅप्टन प्रशांत सुर्वे यांनी राज ठाकरे यांना भेटून उमेदवारी मागितली होती, पण ‘असे’ राजकारण आम्ही करणार नाही, असे राज ठाकरे यांनी कॅप्टन सुर्वे यांना सांगून गवळींविरुद्ध उमेदवार उभा करायचा नाही, हेही सांगितले होते, असे निदर्शनास आणले असता आनंद एंबडवार म्हणाले की, राज ठाकरे आणि प्रशांत सुर्वे यांच्यात काय बोलणे झाले, हे आपल्याला माहीत नाही. ते तुम्ही त्या दोघांनाच विचारा. असे सांगितले.