पक्षबांधणीकडे लक्ष दिले नाही, कोणाला विश्वासात घेतले नाही, केवळ दहाच जागा लढविल्यामुळे फटका बसला, काही सरचिटणीसांना तरी घरी बसवायला हवे, नाहीतर विधानसभेतही काही खरे नाही.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या धक्कादायक पराभवानंतर मनसेच्या तळागाळातील कायकर्ते कमालीचे हबकले असून राज ठाकरे यांनी आता काही तरी ठोस करायला हवे, अशी चर्चा जोरात सुरु झाली आहे.
मनसेने लोकसभा निवडणुकीत उभ्या केलेल्या दहाही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली असून कल्याणचे उमेदवार वगळता एकाही जागी लाखभर मतेही मिळू शकलेली नाहीत. हा मनसेच्या उमेदवारांसाठीच नाही तर कार्यकर्त्यांसाठीही जबरदस्त धक्का असून यापुढे सेना-भाजपचे आव्हान कसे पेलणार असा सवाल हे कार्यकर्ते करत आहेत. लोकसभेच्या प्रचारात राज यांच्या सभांना गर्दीही चांगली जमली होती पण साहेबांची भट्टी जमली नाही, असाच सूर कार्यकर्त्यांकडून व्यक्त होताना दिसतो.
एकीकडे नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक सभेत घणाघाती भाषण करताना नवीन मुद्दे उपस्थित केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्र सभांनी ढवळून काढला. पण मनसेचे एवढे पानिपत का व्हावे, असा प्रश्न कार्यकर्त्यांमधूनच केला जात आहे. बाळा नांदगावकर आणि दक्षिणमध्य मुंबईत आदित्य शिरोडकर यांना लाखाच्या आत मते मिळणे ही मनसेसाठी धोक्याची घंटा आहे.