कॉंग्रेस धोकेबाज पक्ष असून, त्यांचा जाहीरनामा म्हणजे धोकापत्र असल्याची टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पालमपूरमधील जाहीर सभेत केली.
मोदी म्हणाले, मला हे सांगण्याचा निश्चितच आनंद होत नाहीये, मात्र, कॉंग्रेस धोकेबाज पक्ष आहे. हा पक्ष लोकांनाच धोका देतो. त्यांचा २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीतील जाहीरनामा पाहा. तो जाहीरनामा नसून, धोकापत्रच आहे. त्यावेळी जाहीरनाम्यात १०० दिवसांत महागाईला लगाम घालण्याचे आश्वासन या पक्षाने दिले होते. पण कुठे महागाई कमी झाली. मग ते धोकापत्रच नाही का? एखाद्याने चूक केली तर लोक त्याला सांभाळून घेतात. पण कोणी फसवलं तर त्याला जनता माफ करत नाही. आतापर्यंत तुम्ही ६० वर्षे कॉंग्रेसला संधी दिली आहे. आता मला ६० महिने तुमची सेवा करण्याची संधी द्या, असेही आवाहन मोदींनी सभेमध्ये केले.