नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील सभेत बॉलीवूडच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. भाजपला बॉलीवूडची काळजी असली तरी आम्हाला मात्र याच शहरातील गरीब तसेच समाजातील दुर्बल घटकांचा विकास करायचा आहे, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर रविवारी निशाणा साधला. काँग्रेसची स्थापना मुंबईत झाली आणि या शहराच्या जनुकांमध्ये (डीएनए) काँग्रेस आहे, असे सांगत मुंबई आणि काँग्रेसचे अतुट नाते कायम ठेवा, असे आवाहन केले.
सुमारे तीन तास विलंबाने आगमन झालेल्या राहुल गांधी  यांनी ‘मेड ईन मुंबई’चा नारा देत मुंबईतील सर्व वर्गांना मतांसाठी साद घातली. मुंबईच्या विकासाकरिता केंद्र आणि राज्य सरकारने भरीव मदत केली. मग मोनो रेल, मेट्रोपासून मुंबईच्या विकासासाठी काँग्रेसने केलेल्या कामांचा पाढा वाचून दाखविला. कररुपाने मुंबईतून केंद्राला सर्वाधिक उत्पन्न मिळते. पण अशा या मुंबईच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारने लक्ष घातले. भाजप सरकारच्या काळात मुंबईकडे दुर्लक्षच झाले होते. आम्ही फक्त एका वर्गाचा किंवा चार-दोन उद्योगपतींची भरभराट कशी होईल याचा विचार करीत नाही तर समाजातील सर्व वर्गांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
 दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमुळे रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. ठिकठिकाणी उत्पादन क्षमता वाढणार असल्याने ‘मेड ईन महाराष्ट्र’, ‘मेड ईन मुंबई’ अशी नवी ओळख होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.