भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची तुलना लहान मुलाशी केली. गेल्या काही दिवसांपासून फुग्यांशी खेळणाऱ्या राहुल गांधी यांच्या मनात आता टॉफीबाबत कुतुहल निर्माण झाले आहे, असे मोदी म्हणाले.
देशाच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून या निवडणुका महत्त्वाच्या असताना राहुल गांधी यांना ‘फुगा’ या शब्दाने झपाटले आहे. गेल्या दहा दिवसांपासून ते फुग्याशीच खेळत आहेत. मात्र लहान मूल एकाच खेळण्याशी फार काळ खेळू शकत नाही, त्याप्रमाणे राहुल गांधी यांना आता टॉफीने झपाटले आहे, असे मोदी म्हणाले.
राहुल गांधी यांनी गुजरात विकासाचे प्रारूप म्हणजे टॉफी प्रारूप असल्याची खिल्ली उडविली होती. त्याबाबत मोदी म्हणाले की, राहुल यांचा बालिशपणा अद्याप गेलेला नाही, प्रथम ते फुग्याशी खेळत होते आणि आता टॉफीशी खेळत आहेत. गुजरातला ३०० ट्रॉफी मिळाल्या आहेत टॉफी नव्हे, असेही ते म्हणाले. राहुल अजूनही लहानच असल्याचेही ते म्हणाले.