लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्याचे मतदान झाल्यावर आता निकालांचे अंदाज बांधणे सुरु झाले आहे. बहुसंख्य मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेकडे जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषत उत्तर प्रदेश, बिहार या सत्तेचा मार्ग जाणाऱ्या राज्यांसह भाजपची राज्ये असलेल्या ठिकाणी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची कामगिरी चांगली राहील अशी शक्यता आहे. काँग्रेसला केरळमध्ये चांगले यश मिळेल असा अंदाज आहे.
सत्ता समीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपला ५२ जागा मिळतील असा अंदाज टाईम्स नाऊच्या सर्वेक्षणात आहे. तर सीएनएन-आयबीएनच्या सर्वेक्षणात उत्तर प्रदेशमध्ये भाजपला ४५ ते ५३ जागा मिळतील अशी शक्यता आहे. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला १० जागा टाईम्स नाऊने दाखवल्या आहेत तर सीएनएनने काँग्रेसला केवळ तीन ते पाच जागा दाखवल्या आहेत. समाजवादी पक्षाला १० ते १७ तर बसपला टाईम्सने केवळ सहा जागा दाखवल्या आहेत. बिहारमध्येही मोदी लाट जोरात असल्याचा अंदाज आहे. भाजपची युती तोडण्याचा फटका नितीशकुमार यांना बसेल अशी चिन्हे आहेत. केवळ २ ते ६ जागा सर्वेक्षणात दाखवल्या आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २१ ते २७ जागा मिळतील असा अंदाज आहे. तर काँग्रेस ११ ते १५ जागा जिंकेल असे सीएनएनआयबीएन-सीएसडीएसच्या सव्‍‌र्हेक्षणात म्हटले आहे. टाईम्सने मात्र बिहारमध्ये केवळ २ जागा संयुक्त पुरोगामी आघाडीला दाखवल्या आहेत. दिल्लीत सात पैकी पाच जागा भाजप पटकावेल असा अंदाज आहे. तर आम आदमी पक्षाला दोन जागांची शक्यता आहे. गेल्या वेळी सर्व जागा पटकावणाऱ्या काँग्रेसची पाटी दिल्लीत कोरीच राहण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममतांची जादू कायम राहील असा अंदाज असला तरी त्यांना अपेक्षित जागा मिळणार नाहीत. टाईम्स नाऊच्या सर्वेक्षणानुसार पश्चिम बंगालमध्ये ४२ पैकी तृणमुलला २० जागा तर डाव्यांना १५ भाजप २ आणि काँग्रेस ५ जागांचा आहे. तर एबीपी न्यूजने तृणमुलला २४ तर डाव्यांना १२ भाजपला १ आणि काँग्रेसला ५ जागा दिल्या आहेत. सीएनएनने  तृणमुलला २५ ते ३१ जागा दिल्या आहेत. डाव्या पक्षांना ७ ते ११ तर काँग्रेसला २ ते ४ आणि भाजपला १ ते ३ जागा मिळतील अशी शक्यता आहे.तमिळनाडूत ३९ पैकी टाईम्सने अण्णा द्रमुकला ३१ तर द्रमुकला ७ आणि काँग्रेसला केवळ १ जागा दिली आहे. सीएनएनने अण्णा द्रमुकला २२ ते २८ द्रमुकला ७ ते ११ आणि भाजपच्या आघाडीला ४ ते ६ जागा दिल्या आहेत. गुजरातमध्ये २६ पैकी भाजप २२ पर्यंत जागा जिंकेल असा सर्वाचा अंदाज आहे. याखेरीज मध्य प्रदेश, छत्तीसगड या सरकारे असलेल्या राज्यातही भाजपची कामगिरी चांगली राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुवरेत्तर राज्यांमध्येही राष्ट्रीय लोकशाही आघाडी बळ वाढवेल अशी शक्यता वर्तवली आहे.