भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सकाळी वडोदरा लोकसभा मतदारसंघातून आपला निवडणूक अर्ज दाखल केला. वडोदऱयाच्या राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड आणि आणि चहाविक्रेता किरण महिंदा हे यावेळी उपस्थित होते. या दोघांनीही मोदी यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून स्वाक्षरी केली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मोदी म्हणाले, वडोदरा ही माझी कर्मभूमी राहिली आहे. इथेच मी राहात होतो. माझ्या कारकीर्दीचा प्रारंभ मी सौराष्ट्रातून केला. त्यानंतर उत्तर गुजरातमध्ये गेलो आणि आता मध्य गुजरातमधून निवडणूक लढवित आहे. गायकवाड राजघराण्याच्या धोरणांचा मला कायमच लाभ झाला, असे सांगून मोदी यांनी आपले प्राथमिक शिक्षण त्यांच्या शाळेत झाल्याचे सांगितले. सयाजीराव गायकवाड यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. त्यांचे पुस्तक आजच्या शासक आणि प्रशासकांना प्रेरणा देणारे असल्याचेही मोदी म्हणाले.
तत्पूर्वी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वडोदरामध्ये आलेल्या मोदींचे येथील विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. भाजपचे हजारो कार्यकर्ते मोदी यांच्या स्वागतासाठी विमानतळावर जमले होते. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरायला जाण्यापूर्वी मोदी यांनी सुमारे दोन किलोमीटरच्या अंतरावर रॅलीही काढली होती. रस्त्याच्या दुतर्फा हजारो कार्यकर्ते मोदी यांच्या स्वागतासाठी जमले होते.