भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रभुरामचंद्रांच्या नावाचा आधार घेतला. प्रभुरामचंद्रांच्या जन्मस्थानी राहणाऱ्या रहिवाशांनी, काँग्रेस आणि त्या पक्षाला मदत करणाऱ्यांना धडा शिकवावा, असे आवाहन या वेळी मोदी यांनी केले.
अयोध्येतील वादग्रस्त ठिकाणी राममंदिर उभारण्याच्या पक्षाच्या संकल्पनेबाबत मोदी यांनी काही संदर्भ दिले. प्रभुरामचंद्रांची उदाहरणे देऊन मोदी यांनी जनतेला काँग्रेस, सपा आणि बसपाचा पराभव करून भाजपला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. या वेळी व्यासपीठावर मागील बाजूला प्रभुरामचंद्रांचे मोठे छायाचित्र लावण्यात आले होते.
ही श्रीरामचंद्रांची भूमी आहे आणि येथील जनतेचा ‘प्राण जाए पर वचन न जाए’ यावर विश्वास आहे, ज्यांनी आपल्या आश्वासनांकडे पाठ फिरविली त्यांना आपण माफ करणार का, असा सवालही या वेळी मोदी यांनी केला. देशातील १० कोटी जनतेला रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सत्तारूढ पक्षाने दिले होते, त्याचा मोदी यांनी संदर्भ दिला. उत्तर प्रदेशातील सत्तारूढ सपा आणि मायावती यांच्या नेतृत्वाखालील बसपा हे लखनऊमध्ये एकमेकांचे शत्रू आहेत, मात्र दिल्लीत ते मित्र आहेत. या दोघांनीच सोनिया-राहुल यांचे सरकार वाचविले आणि काँग्रेसने या दोघांना सीबीआयपासून वाचविले, असेही मोदी म्हणाले.

फैजाबाद सभेचा अहवालनिवडणूक आयोगाने मागविला
फैजाबाद येथील सभेत मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रभुरामचंद्रांचे नाव घेतल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत असतानाच आता निवडणूक आयोगाने त्या सभेबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून मागविल्याने मोदी यांच्या अडचणींमध्ये भर पडण्याची शक्यता आहे. फैजाबाद सभेचा अहवाल आणि व्यासपीठाच्या मागील बाजूची मांडणी याबाबत जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी उमेश सिन्हा यांनी सांगितले. भाजपचे उमेदवार लल्लूसिंग यांच्या प्रचारासाठी मोदी यांनी फैजाबादमध्ये जाहीर सभा घेतली. त्या सभेच्या व्यासपीठाच्या मागील बाजूला प्रभुरामचंद्र यांचे आणि अयोध्येतील प्रस्तावित राम मंदिराचे चित्र लावण्यात आले होते.

अमेठीत घराणेशाहीवर हल्ला
अमेठी : गांधी घराण्याचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अमेठीत सभा घेऊन भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सोमवारी घराणेशाहीच्या राजकारणावर हल्ला चढविला. तथापि, आपण येथे सूड घेण्यासाठी आलेलो नाही, तर बदल घडविण्यासाठी आलो आहोत, असे या वेळी मोदी यांनी स्पष्ट केले.
मोदी हे द्वेषाचे राजकारण करीत असल्याचा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेला आरोप मोदी यांनी फेटाळून लावला आणि आपण येथे सुडाचे राजकारण करण्यासाठी नाही तर बदल घडविण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या ४० वर्षांपासून गांधी घराणे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असूनही त्याकडे दुर्लक्ष झाले असल्याचेही ते म्हणाले.

काँग्रेसकडून निषेध आणि तक्रार
व्यासपीठाच्या मागील बाजूला प्रभूरामचंद्रांचे छायाचित्र लावून नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारात धर्माचा आधार घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे मोदी यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवून त्या पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. अमेठीमध्ये वादग्रस्त पुस्तिकांचे वाटप केल्याचाही काँग्रेसने निषेध नोंदविला.