सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल माझे चांगले मित्र असल्याचे नरेंद्र मोदी यांनी केलेले वक्तव्य खुद्द पटेल यांनी शुक्रवारी फेटाळले. मोदी यांचे वक्तव्य निराधार असून, ते खोटे बोलत असल्याचा आरोपही पटेल यांनी केला. दूरदर्शन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी अहमद पटेल माझे चांगले मित्र असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून देशात वेगवेगळ्या चर्चेला सुरुवात झाल्यानंतर पटेल यांनी स्वतः मोदी यांचे वक्तव्य फेटाळले.
पटेल म्हणाले, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी मोदी यांनी हे वक्तव्य केले आहे. मोदी यांना त्यांच्या स्वतःच्या पक्षात एकही मित्र नाही, मग ते माझ्याशी कशी काय मैत्री करू शकतील, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
मोदी यांना आपण कधीही त्यांच्या कार्यालयात किंवा निवासस्थानी भेटलेलो नाही. त्यांच्याकडून आपण कोणतीही सवलतही मिळवलेली नाही, असेही पटेल यांनी स्पष्ट केले.