काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या काळातील भ्रष्टाचार आणि नरेंद्र मोदी यांच्या रूपात मिळालेला कणखर चेहरा यांना प्रतिसाद देत देशाच्या जनतेने शुक्रवारी भाजपप्रणीत आघाडीच्या हाती सत्ता देत काँग्रेसचा साफ धुव्वा उडवला. गुजरात असो की दिल्ली, महाराष्ट्र असो की उत्तर प्रदेश जवळपास सर्वच राज्यांतून काँग्रेसला खालसा करत मतदारांनी मोदींच्या पारडय़ात इतक्या जागा ओतल्या की एकटय़ा भाजपनेच २८३ हून अधिक जागा जिंकत सत्तेसाठीचा आकडा पार केला.
एकाच पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवण्याची गेल्या तीन दशकांतील ही पहिलीच वेळ. अखेरचे निकाल हाती आले तेव्हा भाजपप्रणीत एनडीएने ३३६चा आकडा पार केला होता. मोदी लाटेवर स्वार होत भाजपसोबतच भाजपच्या मित्र पक्षांनीही घवघवीत यश मिळवले. तर काँग्रेसचा पुरता सफाया झाला. गेल्या लोकसभेत दोनशेहून अधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसची पन्नाशी गाठता गाठताच दमछाक झाली. विशेष म्हणजे, पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री पराभूत झाले. अगदी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेले राहुल गांधी हेही मतमोजणीतील काही टप्प्यांत पिछाडीवर पडल्याने काँग्रेसजनांना धडकीच भरली होती. पक्षाच्या या दारुण पराभवाची जबाबदारी घेतल्याचे सांगत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी प्रसारमाध्यमांना सामोरे गेले.
भाजपच्या मतांच्या टक्केवारीतही जबर वाढ झाली आहे. २००९मध्ये १८.८ टक्के मते मिळवणाऱ्या भाजपने यंदा ३० टक्क्यांहून अधिक मतांवर कब्जा केला आहे. तर काँग्रेसच्या मतांचा टक्का २८.५ टक्क्यांवरून दहा टक्क्यांवर घसरला. गुजरात, दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गोवा या राज्यांत पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. तर उत्तर प्रदेशसारख्या राज्यातही भाजपने ७१ जागा जिंकून काँग्रेससोबत सप आणि बसपा या राज्यातील प्रमुख पक्षांना चित केले.
भाजपचा हा झंझावात केवळ तामिळनाडू आणि केरळमध्ये पोहोचू शकला नाही. तामिळनाडूत अण्णा द्रमुक पक्षाने ३९ पैकी ३२ जागा जिंकल्या. येथेही काँग्रेसच्या हाती फारसे काही लागले नाही. यंदाच्या निवडणुकीत तर द्रमुकचा एकही खासदार नव्या लोकसभेत राज्याचे प्रतिनिधित्व करणार नाही.  
हिमाचल प्रदेशात भाजपची मुसंडी
हिमाचल प्रदेशातील लोकसभेच्या चारही जागांवर मुसंडी मारून भाजपने आघाडी घेतली आहे. विजयी उमेदवारांमध्ये कांग्रा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री शांताकुमार, मंडी मतदारसंघातील रामस्वरूप शर्मा, हमीरपूर मतदारसंघातून अनुराग ठाकूर व सिमला मतदारसंघातून वीरेंद्र काश्यप हे विजयी झाले आहेत. यामध्ये रामस्वरूप शर्मा यांनी मुख्यमंत्री वीरभद्रसिंग यांच्या पत्नी प्रतिभासिंग यांचा पराभव केला.

ममतांची जादू कायम
देशात मोदींची लाट असताना पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची जादू कायम राहिली. त्यांच्या पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. तर डाव्या आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. २७ टक्के मते मिळवूनही पक्षाला हादरा बसला. माकपने तृणमूलच्या करयकर्त्यांनी दहशत पसरवल्याचा आरोप करीत त्यावर पराभवाचे खापर फोडले आहे. भाजपने राज्यात दोन जागा जिंकताना चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे आता विधानसभेसाठी भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. काँग्रेसने कामगिरीवर समाधान व्यक्त केले असले तरी केंद्रीय मंत्री दीप दासमुन्शी पराभूत झाल्या. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत पुन्हा एकदा चुरशीच्या लढतीत पराभूत झाले. तीसच्या वर जागा जिंकण्याची ममतांची महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली आहे.

गोव्यातील दोन्ही जागा भाजपकडेच
उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही मतदारसंघांतून भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपने उत्तर गोव्याची आपली जागा कायम राखली असून दक्षिण गोव्याची जागा काँग्रेसकडून हिसकावून घेतली आहे.
उत्तर गोव्यात विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांनी काँग्रेसचे उमेदवार रवी नाईक यांचा सुमारे ८८ हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. तर दक्षिण गोव्यातून नरेंद्र सावईकर यांनी काँग्रेसचे उमेदवार रेगिनाल्डो यांच्यापेक्षा सुमारे ३२ हजारांच्या मतांची आघाडी घेतली.

केरळमध्ये भाजपचे खाते नाहीच
तिरुवनंतपुरम् लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार शशी थरूर यांच्याविरोधात कडवी झुंज देऊनही भाजपचे तगडे उमेदवार ओ. राजगोपाल यांना पराभव पत्करावा लागला. परिणामी केरळ राज्यात आपले खाते उघडण्याचे भाजपचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत.राजगोपाल यांना सुरुवातीच्या मतमोजणी फेऱ्यांमध्ये चांगली आघाडीही मिळाली होती, परंतु नंतरच्या फेऱ्यांमध्ये शशी थरूर यांना आघाडी मिळून राजगोपाल पराभूत झाले. थरूर यांनी सुमारे १३ हजारांच्या मताधिक्याने राजगोपाल यांचा पराभव केला. या प्रतिष्ठित मतदारसंघात एलडीएफचे बेनेट अब्राहम हेही आपले नशीब अजमावीत होते. ते तिसऱ्या स्थानी फेकले गेले.

तामिळनाडूत द्रमुक, काँग्रेसला तडाखा
१९९१ नंतर तब्बल दोन दशकांनी काँग्रेस व द्रमुकला तामिळनाडूत मोठा तडाखा बसला असून यंदाच्या निवडणुकीत तर द्रमुकचा एकही खासदार नव्या लोकसभेत राज्याचे प्रतिनिधित्व करणार नाही. काँग्रेसचीही १९९८ पासून अशीच गत झाली असून त्यांचेही यंदा राज्यातून कोणीही खासदार निवडून न येण्याची चिन्हे आहेत.