पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळय़ासाठी शेजारील राष्ट्रांच्या प्रमुखांना निमंत्रण देण्याची नरेंद्र मोदींची नीती फळाला आली असून सोमवारी भारतभेटीवर येण्यापूर्वी पाकिस्तान आणि श्रीलंका सरकारने आपल्या तुरुंगांत असलेल्या भारतीय मच्छिमारांना सोडण्याचा निर्णय जाहीर केला. श्रीलंकेने सर्व भारतीय मच्छिमारांना सोडण्याचे आदेश दिले आहेत, तर पाकिस्तानने रविवारीच १५१ मच्छिमारांची मुक्तता केली.
मोदी यांच्या शपथविधी सोहळय़ाच्या निमित्ताने सदिच्छा भावनेतून या दोन्ही देशांनी भारतीय मच्छिमारांची सुटका करण्याचे जाहीर केले. पाकमधील कराची येथीस मलिर तुरुंगातून ५९ मच्छिमांराची तर सिंध प्रांतातील हैदराबाद येथे असलेल्या नारा तुरुंगातून ९२ मच्छिमारांची रविवारी सुटका करण्यात आली. पंतप्रधान नवाझ शरीफ हे भारताचे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहत असल्याने सदिच्छेच्या भावनेतून या मच्छिमारांना सोडण्यात आले आहे. मलिर तुरुंगाचे अधीक्षक सय्यद नाझीर हुसेन यांनी सांगितले की, अंतर्गत व परराष्ट्र मंत्रालयाच्या लेखी सूचनेनुसार भारतीय मच्छिमारांची सुटका करण्यात आली आहे. पाकिस्तानची सागरी हद्द ओलांडल्याने या मच्छिमारांना अटक करण्यात आली होती. या सोडण्यात आलेल्या मच्छिमारांना वातानुकूलित बसमधून कराची येथून लाहोर येथील वाघा सीमेवर नेऊन भारतीय अधिकाऱ्यांच्या हवाली करण्यात आले.
दरम्यान श्रीलंकेच्या अध्यक्षीय प्रवक्त्याने सांगितले की, आपल्या भारत दौऱ्याच्या निमित्ताने सर्व भारतीय मच्छिमारांची सुटका करण्याचे आदेश श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षा यांनी दिले आहेत. श्रीलंकेच्या मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने नेमक्या किती भारतीय मच्छिमारांना सोडले जाणार आहे याचा नेमका आकडा सांगितलेला नाही.
शेजाऱ्यांची सदिच्छा
पाकिस्तानने गेल्या ऑगस्टमध्ये ३३७ भारतीय मच्छिमारांची सुटका केली होती व त्यानंतर दिवाळीतही १५ मच्छिमारांना सोडले होते.  द्विपक्षीय चर्चेच्या अगोदर श्रीलंकेने सर्व मच्छिमारांची सुटका करावी अशी तामिळनाडू सरकारची मागणी होती. जानेवारीत चेन्नई येथे करार झाल्यानंतरही श्रीलंकेने १६० मच्छिमारांना पकडले आहे.