लोकसभेच्या आगामी निवडणुकीवर व्यापक परिणाम होऊ शकतो, असा प्रकार रविवारी घडला. निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीसाठी अखेरची मुदत म्हणून ९ मार्च रोजी घेतलेल्या विशेष मोहिमेत ७४.५ लाख मतदारांनी मतदार यादीत आपली नावे नोंदविली. निवडणूक आयोगाने याला दुजोरा दिला असून एकाच दिवशी इतक्या मोठय़ा प्रमाणावर मतदार नोंदणी होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
देशभरात उघडण्यात आलेल्या जवळपास ९.३ लाख मतदान केंद्रांत रविवारी ७४ लाख ५६ हजार ३६७ मतदारांनी अर्ज क्रमांक ६ भरून देण्यासठी गर्दी केली होती, असे एक्स्प्रेस वृत्तसेवेने मिळविलेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे.
ही नोंदणी मतदार म्हणून करण्यात आली किंवा नाही याचा निर्णय त्यांच्या पडताळणीच्या प्रक्रियेवर अवलंबून राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जी नावे पडताळणी प्रक्रियेतून  ग्राह्य़ धरली जातील त्यांचा समावेश मतदारयादीत केला जाईल आणि ही प्रक्रिया संबंधित मतदारसंघातील उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापूर्वी पूर्ण केली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
मतदार याद्या सुधारण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू असते, परंतु मतदारांना आपल्या मतदान केंद्रांवर जाऊन आपले नाव यादीतून काही कारणाने वगळले गेले असले किंवा चुकीने रद्द झाले असले तर नव्याने अर्ज करता यावा यासाठी ही एका दिवसाची मोहीम हाती घेण्यात आली होती, असेही अधिकारी म्हणाला.
आम्ही यापूर्वीही अनेकदा अशी मोहीम हाती घेतली होती. त्या वेळी दोन-तीन दिवसांची मुदत देण्यात आली होती, परंतु इतक्या मोठय़ा प्रमाणावर त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र रविवारी मिळालेल्या प्रतिसादाने निवडणूक आयोगाचे अधिकारीही आश्चर्यचकित झाले आहेत. आता पुढील १० दिवसांत ७४ लाखांहून अधिक अर्जाची पडताळणी केली जाणार आहे. ज्याला एखाद्या नावाबद्दल आक्षेप आहे त्याने सात दिवसांच्या नोटीस कालावधीत तो नोंदविणे गरजेचे आहे. या नोंदणी मोहिमेमुळे आता मतदारांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यवार नोंदणी
* उ. प्रदेश : १५.४ लाख
* आंध्र प्रदेश : ११ लाख
* तामिळनाडू : ९.९ लाख
* बिहार : ७ लाख
* महाराष्ट्र : ४.७ लाख
* गुजरात : ३.३ लाख
* कर्नाटक : ३ लाख