लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्षाच्या वाटय़ाला आलेल्या एकुलत्या एका सातारा मतदारसंघात उमेदवारीवरुन गोंधळ सुरू आहे. पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी ज्यांची उमेदवारी जाहीर केली, त्या संभाजी सकपाळ यांच्याविरोधात रिपाइंच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे सकपाळ यांना अजून उमेदवारी अर्ज भरता आला नाही. कार्यकर्त्यांची नाराजी दूर झाली नाही, तर उमेदवार बदलण्याबाबत पक्षात विचार सुरू असल्याचे समजते.  
सातारा जिल्ह्यातील रिपाइं कार्यकर्त्यांना सकपाळ यांची उमेदवारी आवडली नाही. सकपाळ यांनीही रिपाइं कार्यकर्त्यांशी संपर्क साधून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला नाही, अशाही तक्रारी आहेत. जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी तशी नाराजी पक्षनेतृत्वाला कळविली. सकपाळ यांचा उमेदवारी अर्ज १९ मार्चला भरण्याचे ठरले होते. त्यासाठी रामदास आठवले साताऱ्याला जाणार होते. परंतु पक्षातील नाराजी लक्षात घेऊन त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे सकपाळ यांना कळविल्याचे समजते. आता २५ मार्चला अर्ज भरण्याचे ठरविले आहे. परंतु त्याआधी स्थानिक कार्यकर्त्यांँमघील नाराजू दूर झाली नाही, तर उमेदवार बदलण्याबाबतही पक्षात विचार सुरू असल्याचे सांगण्यात येते.