News Flash

मुंबईतील प्रश्नांवर खासदारांशी मुख्यमंत्र्यांची बैठक- सोमय्या

खासदार किरीट सोमय्या आणि गोपाळ शेट्टी यांनी विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी मुंबईतील नवनिर्वाचित खासदारांची बैठक बोलाविण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली.

| May 22, 2014 03:19 am

खासदार किरीट सोमय्या आणि गोपाळ शेट्टी यांनी विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी मुंबईतील नवनिर्वाचित खासदारांची बैठक बोलाविण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली. ही बैठक पुढील आठवडय़ात बोलाविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. तर पावसाळ्याच्या तोंडावर कँपाकोला इमारत पाडण्यात येऊ नये, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
विक्रांत युध्दनौका भंगारात काढू नये, रेल्वे फलाटांची उंची वाढविणे, यासह अन्य प्रश्न, मेट्रो रेल्वेचा वाढलेला खर्च व त्यामुळे वाढणारे तिकीट, इमारत पुनर्विकास व दुरूस्तीसाठी संरक्षण विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र, कचरा डेपो आदी विषयांवर सोमय्या आणि शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.  विक्रांत युध्दनौकेचे स्मारक व्हावे, यासाठी केंद्र सरकारने निधी पुरविण्याबाबत संरक्षण सचिवांना विनंती करण्यात आली आहे. नवीन मंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यावर त्यांनाही निवेदन दिले जाईल. महापालिकेनेही १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची तयारी दाखविली आहे, असे त्यांनी सांगितले.
संरक्षण खात्याचे ना-हरकत प्रमाणपत्र सक्तीचे असल्याने पश्चिम उपनगरातील अनेक इमारतींचा पुनर्विकास व दुरूस्ती रखडली आहे. त्यांच्याकडून अडवणूक होत असल्याने ही सक्ती काढून टाकण्याची विनंती करण्यात आली आहे, असे शेट्टी यांनी सांगितले. आठ रेल्वेस्थानकांवरील फलाटांची उंची वाढविण्याचे काम दोन दिवसांत सुरू होणार असून ५४ स्थानकांवरील कामांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल, अशी माहिती सोमय्या यांनी दिली. रेल्वेच्या उच्चपदस्थांशी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली.
विधिमंडळात आवाज उठविणार
उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांच्याविरोधात आरोप केलेल्या सोमय्या यांनी आता त्यांची प्रकरणे विधिमंडळात अधिक प्रभावीपणे भाजपकडून मांडली जातील, असे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 3:19 am

Web Title: mumbai mp meets cm on mumbai issues
Next Stories
1 लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत नाही
2 आठवलेंना केंद्रात राज्यमंत्रिपद?
3 सत्तेसाठी केजरीवालांची धडपड व्यर्थ
Just Now!
X