मालाड पूर्वेतील अप्पर गोविंद नगरातील ‘कैलास रामकृपा’ टॉवरमध्ये निवडणुकीच्या काळापुरते कुटुंबासह वास्तव्याला असलेले वायव्य मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार महेश मांजरेकर यांच्या दृष्टीने मतदानाचा दिवस हा अन्य दिवसासारखाच! टॉवरमध्येही कुणाला काही देणेघेणे नव्हते. (दादर-शिवाजी पार्कातील ‘उल्हास’ या इमारतीत ते राहतात).  साधारणत: दहाच्या सुमारास मांजरेकर, पत्नी मेधा, मुलगी जोयू आणि गौरीसह बाहेर पडले. त्यांची वॉक्सव्ॉगन गाडी थेट निघाली ती माहीम दग्र्याच्या दिशेने.
‘आजचा दिवस कसा वाटतोय?’ या प्रश्नावर ते शांतपणे उद्गारले.. नेहमीसारखाच!  मी जिंकण्यासाठीच उभा आहे. परंतु माझ्या नशिबात जे असेल ते होईल.. बऱ्याच दिवसांनी शांतपणे झोपलो.. असे त्यांनी सांगितले.  मतदारसंघात जाण्याऐवजी थेट माहीम दग्र्यात..? गेली अनेक वर्षे येतोय.. आजही वाटले आलो.. त्यात विशेष असे काही नाही.. प्रत्येक वेळी येतोच असेही नाही.. मांजरेकर सांगतात. मकदूम अलीबाबांच्या कबरीवर चादर चढवून सपत्नीक स्वारी निघाली ती सिद्धिविनायक मंदिरात. सिद्धिविनायकाला विजयाचे साकडे घातले का? असे विचारता, फक्त स्मितहास्य करीत मांजरेकर बाहेर आले. तेथून ते थेट निघाले आपल्या जुन्या घरी-चुनाभट्टीला. याचे कारण सांगताना ते म्हणाले, मी पूर्वी येथे राहायचो. त्यामुळे माझे नाव येथील मतदार यादीत आहे. चुनाभट्टीच्या विद्या विकास हायस्कूलमध्ये प्रचंड मोठी रांग लागलेली असते. परंतु उमेदवार आणि सेलिब्रेटी याचा फायदा होऊन मांजरेकरांना काही मिनिटांतच मतदान करता आले. तोपर्यंत साडेअकरा वाजलेले असतात.
वाटेत माटुंग्यांच्या कॅफे मद्रासमध्ये इडली, रसम आणि म्हैसूर डोशावर ताव मारला जातो.. तेथून गाडी पश्चिम द्रुतगती मार्गावरून थेट मालाडमध्ये शिरते. तेथून दिंडोशी, गोरेगाव, अंधेरी पूर्व, आंबोली परिसरातील विविध मतदान केंद्रांवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत अखेर ते गोरेगावच्या रत्ना हॉटेलशेजारच्या मुख्य निवडणूक कार्यालयात जाऊन स्थिरावले. तेथून थोडय़ा वेळाने मनसैनिकांचे आभार मानून आपल्या दादरच्या घरी रवाना झाले..