दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आणि स्थायी समितीचे चार वर्षे अध्यक्षपद भूषविलेले राहुल शेवाळे कर्जबाजारी आहेत. त्यांची मालमत्ता ६४ लाखांची आणि त्यांच्यावर ५४ लाखांचे कर्ज आहे. त्यांच्यावर नुसते कर्जाचे नव्हे तर, फसवणूक, मारहाण, सार्वजनिक शांततेचा भंग करणे अशा गुन्ह्य़ांचेही ओझे आहे. अर्जासोबत प्रतिज्ञापत्रात त्यांनी ही माहिती दिली आहे.
संजीव नाईक करोडपती
ठाण्यातील राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांची एकुण जंगम मालमत्ता – ५ कोटी २४ लाख ४३ हजार ७६० वाहन – स्कॉर्पीओ  पत्नीची जंगम मालमत्ता – ५५ लाख ५० हजार २८९ एकुण स्थावर मालमत्ता = शेतजमीन – १ कोटी ८९ लाख १५ हजार गाळे – ५९ लाख ६० हजार घरे – ४ कोटी २७ लाख ६० हजार ८४२कर्ज – २ कोटी १८ लाख ७९ हजार ९५७
पत्नीची स्थावर मालमत्ता = गाळे – २ कोटी ११ लाख ४१ हजार ७५०
कर्ज – २ कोटी २१ लाख ६ हजार ७८९

शेवाळेंकडे ६४ लाखांची मालमत्ता
प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती दोन वर्षांतच कैक पटीने वाढल्याचे दिसून येते. २०१२ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शेवाळे सेनेचे उमेदवार म्हणून निवडून आले. त्यावेळी त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात जेमतेम दीड लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे नमूद केले होते. लोकसभेचे उमेदवार म्हणून त्यांनी या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ६४ लाख ६६ हजार ३६९ रुपये इतकी मालमत्ता दाखवली आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर ५४ लाख ६५ हजार ८०० रुपयांचे कर्ज असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आदित्य शिरोडकरही गुन्ह्य़ांचे धनी
याच मतदारसंघातून निवडणूक लढविणारे मनसेचे आदित्य शिरोडकर हे सुमारे दोन कोटी रुपयांची मालमत्ता असलेले उमेदवार आहेत. त्यांच्यावरही तोडफोड करणे, बेकायदा जमाव जमवणे, शस्त्र वापरणे, सार्वजनिक शांततेचा भंग करणे अशा प्रकारच्या सहा गुन्ह्य़ांची आझाद मैदान, वरळी, शिवाजी पार्क, माटुंगा व मुलुंड पोलीस ठाण्यात नोंद आहे. त्यांनीही त्यांच्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे.

आम आदमी कोटय़धीश
दक्षिण-मध्य मुंबईतून आम आदमी पक्षाने सुंदर बालकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. ते आम आदमीचे उमेदवार असले, तरी कोटय़धीश आहेत. उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ५८ लाख ५७ हजार रुपये जंगम व १ कोटी ६५ लाख रुपये स्थावर मालमत्ता असल्याचे नमूद केले.