परळी येथील वैजनाथ साखर कारखान्याच्या परिसरात गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्कारासाठी आणि पार्थिव ठेवण्यासाठी केलेला ओटा कमी उंचीचा होता, त्यामुळे नेत्याचे अखेरचे दर्शन मिळावे, या उद्देशाने आलेल्या कार्यकर्त्यांची मोठी निराशा झाली, यातूनच रेटारेटी सुरू झाली. त्यानंतर लाकडी अडथळे दूर करीत कार्यकर्त्यांनी सुरक्षा कडे तोडले आणि मग अंत्यविधी सुरू असताना आणि त्यानंतरही सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा वाजले.
१२ वाजून ३० मिनिटांनी गोपीनाथ मुंडे यांचे पार्थिव साखर कारखान्याच्या प्रांगणात आणण्यात आले, तेव्हा मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआयमार्फत चौकशी केली जावी, अशा घोषणा सुरू झाल्या. विशेष म्हणजे याच वेळेत नितीन गडकरी व गृहमंत्री आल्याचे ध्वनिक्षेपकावरून सांगितले जात होते.
सुरक्षा कडे तोडण्यासाठी एकच गलका सुरू झाला, एका पोलिसाने कार्यकर्त्यांवर लाठी चालवली, त्यामुळे जमाव पांगण्याऐवजी दगडफेक सुरू झाली. दगडफेक रोखण्यासाठी ध्वनिक्षेपकावरून मुंडे यांची शपथ कार्यकर्त्यांना घातली जात होती. ‘नेत्याचे अंत्यदर्शन घेऊन सन्मान वाढवा, काळिमा फासू नका’ असे आमदार पंकजा पालवे यांना सांगावे लागले. तेवढय़ापुरता गोंधळ थांबायचा आणि दुसऱ्या बाजूने गर्दी वाढायची. जमावाला शांततेत ठेवायचे आणि लाठीमारही करायचा नाही असा बाका प्रसंग पोलिसांवर होता. अंत्यदर्शनाच्या रांगा लावण्यासाठी नंतर केंद्रीय सुरक्षा रक्षकांची मदत घेण्यात आली. ध्वनिक्षेपकावरून भाजपचे देवेंद्र फडणवीस, सुजित सिंह ठाकूर, पाशा पटेल ही नेतेमंडळी जमावाला शांत राहण्याचे आवाहन करीत होती. काही पोलीस शांत रहा, गोंधळ करू नका, असे जमावाला सांगत होते, परिणामी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी बनविलेल्या शामियान्यातही लोक घुसले, गर्दीमुळे ताण वाढत होता. लोखंडी मंडप एका बाजूने कलला, तेव्हाही चेंगराचेंगरी होईल, असे वातावरण निर्माण झाले, भाजपच्या प्रवक्त्या शायना एन.सी. व अन्य व्यक्ती सुरक्षारक्षकांना घेऊन बाहेर पडल्या. याच काळात राज्य सरकारमधील काही मंत्री अंत्यसंस्काराच्या विधीत सहभागी झाल्याची घोषणा झाली, त्यामुळे पुन्हा चौकशीची मागणी जोर धरू लागली. जमावाला शांत करण्यासाठी आमदार पंकजा पालवे यांना वारंवार गोपीनाथ मुंडे यांची शपथ तुम्हाला आहे, असे सांगावे लागत होते. याचवेळी १ वाजून ४५ मिनिटांनी गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला, त्यानंतर तब्बल सहा तास वाहतुकीची कोंडी झाली. ही कोंडी दूर करण्यासाठी केवळ दोन-चारच कर्मचारी दिसून आले. मुंडे यांचा मृत्यू अपघाताने की घातपाताने एवढी एकच चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती, त्याची चौकशी करण्याविषयीची भावना पंतप्रधान मोदी व गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आमदार पंकजा पालवे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून अंत्यविधीच्या वेळी दगडफेक करणारे कार्यकर्ते मुंडे यांचे समर्थक नव्हते, त्यामुळे दगडफेकीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.