जाहीर सभा आणि गंगेच्या आरतीला निवडणूक आयोगाने परवानगी नाकारल्याने नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. निवडणूक आयोगासारखी स्वतंत्र संस्था निःपक्षपातीपणे काम करीत नाही हे दुर्दैवी आहे. त्यांच्या अशा कामामुळेच आमचे कार्यकर्ते त्यांच्याविरोधात आंदोलन करणार आहेत, असे ट्विट मोदी यांनी केले आहे. त्याचबरोबर आरती न करू दिल्याबद्दल त्यांनी गंगामातेची माफी मागितली आहे. मातेचे प्रेम हे राजकारणापेक्षा श्रेष्ठ असते, हे इथल्या अधिकाऱयांना कळावे, अशी आपली इच्छा असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. सभेला परवानगी नाकारल्याबद्दल कार्यकर्त्यांनी शांततेत आंदोलन करावे. आंदोलनामुळे सामान्यांना कोणताही त्रास होऊ नये, याची काळजी त्यांनी घ्यावी, असेही मोदी यांनी म्हटले आहे.
दरम्यान आम आदमी पक्षाचे निमंत्रक आणि वाराणसीतील पक्षाचे उमेदवार अरविंद केजरीवाल यांनी मोदी यांना खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे. वाराणसीतील जनतेने थेटपणे आम्हाला प्रश्न विचारावेत आणि आम्ही त्याची उत्तर द्यावी, असे केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे. याआधीही गुजरातमधील विकासासंदर्भात केजरीवाल यांनी मोदींबरोबर चर्चा करण्याची मागणी केली होती. मात्र, मोदींनी त्याला प्रत्युत्तर दिले नव्हते.