भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, हे बोलायला चांगले आहे पण याच भारतातील उत्तर भारतीय महाराष्ट्र काबीज करायला निघाले आहेत त्याचे काय, ते आपल्या राज्यात येतात, स्वत:चा मतदार संघ तयार करतात, त्यांची संख्या वाढत आहे. देशात परप्रातीयांना सामावून घेणारा सर्वात मोठा जिल्हा ठाणे असून या मतदार संघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांना मराठी मतांपेक्षा उत्तर भारतीयांची मते प्रिय आहेत, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी नवी मुंबईतील नाईक कुटुंबावर हल्लाबोल केला.
ठाणे लोकसभा मतदार संघातील मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांच्या प्रचारासाठी घणसोली येथे राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना राज यांनी पुन्हा एकदा परप्रांतीयांबाबत आक्रमक भूमिका घेतली. त्याचवेळी ठाणे जिल्ह्यात वाढत असलेल्या परप्रांतीयांच्या संख्येबाबत त्यांनी स्थानिक खासदारांवर टीकास्त्र सोडले. उत्तर भारतीयांची महाराष्ट्रातील संख्या वाढत असून राज्यातील नेत्यांना त्यांच्या समोर गुडघे टेकावे लागत आहे, लाचार व्हावे लागत आहे, अशा शब्दांत राज यांनी परप्रांतीयांच्या लांगुलचालन करणाऱ्यांवर टीका केली.  
ठाण्याचे खासदार संजीव नाईकही परप्रांतीयांचे लांगुलचालन करत असल्याचा आरोप त्यांनी केला. संजीव नाईक यांच्या ठाण्यातील एका बैठकीचा वृत्तांत उपस्थितांसमोर मांडत, नाईक यांना उत्तर भारतीयांची मते प्रिय आहेत. उत्तर भारतीयांसाठी ट्रेनचे तिकिट काढून देणाऱ्या संजीव नाईक यांनी तुम्हाला कधी कोकणातील गणपतीसाठी रेल्वेचे तिकिट काढून दिले आहे का, असा सवाल त्यांनी केला.  नाईक कुटुंबियाने सर्व पदे आपल्याकडे ठेवली असून कार्यकर्ते केवळ राबण्यासाठी असल्याचे त्यांनी अनेक वेळा दाखवून दिले आहे. त्यामुळे त्यांच्या गुलामगिरीतून बाहेर पडा असे आवाहन ठाकरे यांनी केले.
काँग्रेसने गेली साठ वर्षे देशावर राज्य केले. आपल्यामागून निर्माण झालेले छोटे छोटे देश आपल्यापेक्षा पुढे गेले आहेत. त्यांच्यात आमूलाग्र बदल झाले आहेत पण आपल्याकडे आजही पाणी, रस्ते, नोकरी, गरीबी या विषयावरच निवडणूका लढवल्या जात असल्याची टीका राज यांनी केली.