आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्याप्रचार समितीची धुरा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा देऊन नारायण राणे यांनी वापरलेले दबावतंत्र अखेर यशस्वी झाले आहे. अर्थात राणे यांच्याकडे प्रचार समितीचे प्रमुखपद देण्यात आले असले; तरी निवडणूक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याच नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे निवडणूक जाहीरनामा समिती, तर अशोक चव्हाण यांच्याकडे समन्वय समितीचे प्रमुखपद देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक एकूण चार माजी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येणार आहे.
मंत्रिपदाचा राजानामा दिल्यानंतर नाराज असलेल्या राणे यांची मनधरणी केंद्रीय स्तरावरून करण्यात आली नव्हती. त्यामुळे नारायण राणे व त्यांच्या समर्थकांमध्ये कमालीची अस्वस्थता वाढली होती. राणे आक्रमक स्वभावाचे नेते आहेत. शिवाय शिवसेनेशी निवडणुकीच्या मैदानात चार हात करण्याची क्षमता राणे यांच्यामध्ये आहे. शिवसेनेला टक्कर देण्यासाठी राणे यांच्याकडे प्रचार समितीची धुरा सोपवण्यात आल्याचे दिल्लीस्थित काँग्रेस नेत्याने सांगितले. या पदासाठी अशोक चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती, परंतु राणे यांची समजूत काढण्यासाठी त्यांना हे पद देण्यात आले. राणे यांना प्रचार समितीचे प्रमुख केल्याने पक्ष-संघटनेत सकारात्मक संदेश जाण्याची हायकमांडला आशा आहे. एका पाहणीत आघाडीला पराभव पत्करावा लागण्याची चिन्हे आहेत. या पाश्र्वभूमीवर राणे यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जाते. प्रचारासाठी आक्रमक रणनीती, केंद्रीय नेत्यांच्या सभा, तिकिटवाटपात कमी गोंधळ व सर्वाशी समन्वय साधा, असा संदेश राणे यांना हायकमांडने दिला आहे. सत्ताविरोधी लाटेमुळे नारायण राणे यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.
राणे प्रमुख असलेल्या प्रचार समितीत ३३ सदस्य आहेत, ज्यामध्ये अनंतराव थोपटे, रोहिदास पाटील, खा. रजनी पाटील, अविनाश पांडे व माजी खासदार मिलिंद देवरा यांचा समावेश आहे. याशिवाय अशोक चव्हाण प्रमुख असलेल्या समन्वय समितीत सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक, मुरली देवरा, गुरुदास कामत, मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रा. जनार्दन चांदूरकर, खा. हुसैन दलवाई, पतंगराव कदम, कमलताई व्यवहारे, शरद रणपिसे यांचा समावेश आहे. जाहीरनामा समिती ३९ जणांची आहे. बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, नितीन राऊत, खा. राजीव सातव व पक्ष प्रवक्ते अनंत गाडगीळ यांच्यावर जाहीरनाम्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
 निवडणूक समितीची सूत्रे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे आहेत. या समितीत मुकुल वासनिक, अशोक चव्हाण, विलास मुत्तेमवार, राजीव सातव व प्रिया दत्त यांना स्थान देण्यात आले आहे.
प्रसारमाध्यम व प्रसिद्धी समितीचे अध्यक्षपद हर्षवर्धन पाटील यांना देण्यात आले आहे. त्यांच्या जोडीला माजी मंत्री राजीव शुक्ला, संजय निरुपम, अमित देशमुख व केंद्रीय गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे समितीची जबाबदारी सांभाळतील. संजय दत्त, सचिन सावंत व आशीष कुलकर्णी हे या समितीचे समन्वयक राहतील.

मुख्यमंत्री विरोधकांकडेच निवडणुकीची जबाबदारी
मुंबई :सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे आणि अशोक चव्हाण हे तिन्ही माजी मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पक्षांतर्गत विरोधक मानले जातात आणि त्यांच्यावरच निवडणुकीच्या दृष्टीने विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. शिंदे, चव्हाण आणि राणे या तिन्ही माजी मुख्यमंत्र्यांचे पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी फार काही चांगले संबंध राहिलेले नाहीत. ‘आदर्श’प्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेल्या भूमिकेवरून शिंदे आणि अशोक चव्हाण हे संतप्त झाले होते. राणे यांनी तर निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणनू चव्हाण यांच्यावर तोफ डागली होती.

निवडणूक नियोजन
* प्रचार समितीप्रमुख नारायण राणे
* समन्वय समितीप्रमुख अशोक चव्हाण
* जाहीरनामा समितीप्रमुख सुशीलकुमार शिंदे
* निवडणूक समिती प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे
* प्रसारमाध्यम व प्रसिद्धी समितीचे अध्यक्षपद हर्षवर्धन पाटील